loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुक्यातील भातशेती बुडाली; अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे स्वप्न पाण्यात : नुकसानीमुळे शेती न करण्याचा निर्णय

बांदा (प्रतिनिधी) - गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, न्हावेली, दांडेली, बांदा, वाफोली, इन्सुली, विलवडे आणि ओटवणे या भागांतील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली. काही ठिकाणी नदी-नाले ओसंडून वाहत होते, तर पाणी शेतात घुसल्याने उभे पीक पूर्णपणे बुडाले. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकर्‍यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. सरकार सातबारा कोरा करत नाही आणि अवकाळी पाऊस आमची पाठ सोडत नाही, अशा शब्दांत शेतकर्‍यांचा संताप व्यक्त होत आहे. हंगामभर मेहनत करून उभे केलेले पीक आता कुजत असून कापणी सुरू करण्याआधीच सगळे श्रम वाया गेल्याचे मडुरा पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वारंवार अवकाळी पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान पाहून काही शेतकर्‍यांनी भविष्यात शेती न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अशा परिस्थितीत नुकसान भरपाई दिल्यास शेतकरी सावरू शकतो. सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाला सामोरे जात असून, त्यांचे श्रम आणि स्वप्न मात्र पावसाच्या पाण्यात विरघळले आहेत. सरकारकडून पंचनाम्याचे काम सुरू झाले असले, तरी त्यासाठी विविध निकष लावण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे. अनेक शेतकरी दुसर्‍यांच्या जमिनीत शेती करतात ते कागदपत्रे देऊ शकत नाहीत त्यांचे काय? याची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा अंदाज घ्यावा आणि तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रितेश गवंडे यांनी केली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीसोबतच गावातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. रस्ते आणि पाण्याचे प्रवाह अडथळ्यांमुळे अनेक ठिकाणी बंद झाले आहेत. ग्रामीण भागात आता सरकारकडून तातडीची मदत आणि शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची अपेक्षा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg