loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावरील माणगाव येथील वाहतूक कोंडी संपता संपेना, कोकणातील नागरिकांत संतापाचे वातावरण

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम वर्षानुवर्षे रखडत असल्याचा फटका पुन्हा एकदा कोकणातील हजारो निरपराध प्रवाशांना बसला. दिवसभर महामार्गावर ३ कि.मी. पर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. उन्हाळी सुट्टी, लग्नसराईचा हंगाम आणि कोकण पर्यटनाची लाट यांच्या एकत्रित तडाख्याने यंदाची कोंडी अधिकच भीषण बनली. माणगावातील वाहतूक कोंडीची साडेसाती संपता संपेना झाली असून या मार्गावरील अपूर्ण बायपासमुळे महामार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रवासी पर्यटक कडक उन्हात तासनतास महामार्गावर अडकून पडले होते. ही वाहतूक कोंडी तब्बल गेली दोन महिने झाले अशीच कायम राहिली आहे. मात्र दुपारी साडेतीन नंतर ही वाहतूक कोंडी कमी झाली होती. मुंबई आणि पुण्याकडून कोकणाच्या दिशेने निघालेल्या तसेच कोकणातून परतणार्‍या वाहनांच्या प्रचंड लोंढ्याने महामार्ग अक्षरशः ठप्प झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माणगावपासून मुंबई दिशेला आणि महाड दिशेला अशा दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार, एसटी बस, खासगी प्रवासी वाहने आणि मालवाहतूक ट्रकांनी महामार्ग पूर्णपणे व्यापून टाकला होता. कडक उन्हात गाड्यांमध्ये तासनतास बंदिस्त राहिलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी, अन्न, इंधन आणि प्रसाधनगृहे यांचीही तीव्र वानवा भासू लागली. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची अवस्था एकदम बिकट झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा मानला जातो. मात्र त्याच महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे सर्वाधिक भुर्दंड सामान्य प्रवाशांनाच सोसावा लागत आहे. सरकारने वेळोवेळी काम पूर्तीच्या घोषणा केल्या, मुदत वाढींवर मुदतवाढी दिल्या, परंतु प्रत्यक्ष परिस्थिती जैसे थे च राहिली आहे. लाखो कोकणवासीय आणि पर्यटकांच्या सोयीसाठी या रखडलेल्या बायपास प्रकल्पांकडे सरकार नेमके कधी गांभीर्याने लक्ष देणार, हा प्रश्न आता केवळ विचारण्यापुरता उरलेला नाही. तो एक सामाजिक जखम बनली आहे.

टाईम्स स्पेशल

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून माणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतूक शाखेचे पोलीस आणि होमगार्ड यांना तातडीने रस्त्यावर तैनात करण्यात आले. कडक उन्हाची पर्वा न करता हे सर्व जण वाहतूक सुरळीत करण्यासाठी झटत होते. काही ठिकाणी वाहनांना पर्यायी मार्गावर वळवण्याचे प्रयत्नही झाले. मात्र वाहनांचा ओघ इतका प्रचंड होता की या प्रयत्नांना केवळ मर्यादित यश मिळाले आणि कोंडी पूर्णपणे सुटण्यास बराच वेळ लागला. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम वेळेत पूर्ण झाले असते, तर शहराच्या अंतर्गत बाजार पेठेतून जाणारी वाहतूक पूर्णपणे टळली असती आणि अशी कोंडी निर्माणच झाली नसती, असे स्थानिक नागरिक ठामपणे सांगतात. या बायपाससाठी गेल्या काही वर्षांत अनेक ठेकेदार बदलले, अनेक घोषणा झाल्या, आश्वासनांचे पेव फुटले परंतु प्रत्यक्ष कामाची गती मात्र कायम संथच राहिली. परिणामी प्रत्येक सण, उत्सव आणि सुट्टीच्या काळात हीच यातना प्रवासी पर्यटकांना वारंवार भोगावी लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg