loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांचा गौरव होणार

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील (फणसवणे या ग्रामीण गावातील) ज्येष्ठ पत्रकार सत्यवान विचारे यांना पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि संघटनात्मक योगदानाची दखल घेत ’चैतन्य आर्ट्स चिपळूण’ संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय ’जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चैतन्य आर्ट्स चिपळूण ही संस्था गेली २५ वर्षे संगीत, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून, यावर्षी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने पत्रकार सत्यवान विचारे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय पत्रकारितेच्या प्रवासाचा सन्मान म्हणून त्यांची राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार सत्यवान विचारे यांनी १९९७ साली पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक दैनिकांत संगमेश्वर प्रतिनिधी, तर रत्नागिरी प्रतिनिधी म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी बजावली. सध्या ते दैनिक रत्नागिरी टाइम्स, टाइम्स डिजिटल माध्यमांसाठी संगमेश्वर व चिपळूण प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या जवळपास तीन दशकांपासून ग्रामीण भागातील प्रश्न, लोकहिताचे विषय, सामाजिक घडामोडी, प्रशासन, शिक्षण, आरोग्य आणि विकासकामांवर सातत्याने निर्भीड व वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत त्यांनी वाचकांचा विश्वास संपादन केला आहे. पत्रकारितेबरोबरच संघटनात्मक क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

टाईम्स स्पेशल

ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे गेली ११ वर्षे केंद्रीय खजिनदार म्हणून त्यांनी जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून, पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि संघटनेच्या बळकटीसाठी सातत्याने कार्य केले आहे. हा पुरस्कार शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, चिपळूण येथील स्व. देवरुखकर निर्मित इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रातील भव्य रंगमंचावर आयोजित विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. सत्यवान विचारे यांना जाहीर झालेल्या या राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराबद्दल पत्रकार, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg