loader
Breaking News
Breaking News
Foto

युवा आणि महिलांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्यानिषेधार्थ रत्नागिरी शहर रस्त्यावर उतरले

रत्नागिरी : देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या नीट पेपरलीक प्रकरणाचा आणि जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या युवा तसेच महिलांवर झालेल्या अमानुष लाठीमाराचा तीव्र निषेध करण्यासाठी आज रत्नागिरी शहर संपूर्णपणे रस्त्यावर उतरले. शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य निषेध मोर्चाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. सत्ताधार्‍यांच्या दडपशाही आणि असंवेदनशील धोरणाविरोधात रत्नागिरीतील हजारो नागरिकांनी आणि महाविद्यालयीन तरुणाईने प्रशासनाला आपल्या आक्रमक भूमिकेची थेट जाणीव करून दिली. देशाला हादरवून सोडणार्‍या नीट भ्रष्टाचारात २२ विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून, याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक गेल्या २१ दिवसांपासून जंतरमंतरवर आमरण उपोषणाला बसले होते. मात्र, शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेता, त्यांना अत्यंत क्रूरपणे आणि अमानुष रीतीने चादरीत गुंडाळून पळवून नेण्याचे लज्जास्पद कृत्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा प्रकार लोकशाहीचा गळा घोटणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या देशभरातील लाखो युवा-युवतींवर अश्रूधूर आणि बेसुमार लाठीचार्ज करून त्यांना मरणासन्न करणार्‍या जुलमी शासनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. या मोर्चादरम्यान आंदोलक तरुणांनी जब जब मोदी डरता है, पोलीस को आगे करता है!, पंतप्रधान, गृहमंत्री, शिक्षण मंत्री खुर्च्या खाली करा!, शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे! आणि तुमची लाठी, आमची छाती! अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुण, विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, कामगार संघटना आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक जनसमुदाय उसळल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचे पार तीन तेरा वाजले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि गर्दी नियंत्रित करताना पोलिसांचे संपूर्ण नियोजन ढासळले होते. या ऐतिहासिक मोर्चात प्रामुख्याने माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार हुस्नबानू खालीफे, आयोजक अभिजीत हेगशेट्ये, रवींद्र कोकरे, राजेंद्र जाधव, युसूफ आर्ते, शहर प्रमुख प्रमोद शेरे आणि अशोक जाधव यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अग्रभागी होते. या सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला निवेदन सादर केले. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला रत्नागिरीकरांचा जाहीर पाठिंबा घोषित करत, शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार करणार्‍या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारमंचच्या वतीने करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg