loader
Breaking News
Breaking News
Foto

जगबुडी नदीत मॅगीने भरलेला कंटेनर कोसळला; NDRF च्या अथक प्रयत्नांनंतर चालकाचा मृतदेह बाहेर

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावर बुधवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात मॅगीने भरलेला कंटेनर थेट नदीपात्रात कोसळल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणारा कंटेनर जगबुडी नदी पुलाजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि महामार्गावरील दोन पुलांच्या मधून कंटेनर थेट नदीत कोसळला. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने कंटेनर सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत वाहत जाऊन नदीपात्रात अडकला. अपघातामुळे कंटेनरमधील मोठ्या प्रमाणातील मॅगीची पाकिटे नदीत विखुरल्याचे चित्र पाहायला मिळाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) घटनास्थळी दाखल झाले. मात्र नदीला आलेला पूर, मुसळधार पाऊस आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एनडीआरएफचे पथक बुधवारीच घटनास्थळी पोहोचले होते. मात्र खेडचे उपविभागीय अधिकारी (SDM) यांच्या सूचनेनुसार गुरुवारी सकाळी पुन्हा बचावमोहीम सुरू करण्यात आली. एका बोटीत एनडीआरएफचे जवान तर दुसऱ्या बोटीत जनरेटर पाठवून नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविण्यात आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अखेर कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून मृतदेह पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (RTO) अधिकाऱ्यांना जगबुडी नदी पुलाला अद्याप ब्लॅक स्पॉट घोषित का करण्यात आले नाही, असा जाब विचारला. हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक असून यापूर्वीही येथे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

यावेळी ॲड. खेडेकर यांनी महामार्गावरून धावणाऱ्या ओव्हरलोड मालवाहतूक वाहनांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जगबुडी नदी पुलावरील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी या ठिकाणाला त्वरित ब्लॅक स्पॉट घोषित करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अपघातांची शक्यता लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अपघात झालेल्या ठिकाणी मोठे सिमेंटचे बॅरिकेड्स लावून घेण्यात आले. ही व्यवस्था मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी यांच्या पुढाकारातून करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी मदत ग्रुप खेड नेहमीच पुढाकार घेत राहील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg