loader
Breaking News
Breaking News
Foto

मिऱ्या–नागपूर महामार्गावरील ग्रामस्थांच्या अडीअडचणींबाबत आमदार किरण सामंत ह्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध अडीअडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस लांजा–राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत प्रमुख उपस्थित होते. बैठकीत महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेल्या स्थानिक अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानभरपाई, सेवा रस्ते, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या, बंद झालेले मार्ग, पुल व गटारांची आवश्यकता, सुरक्षित वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित प्रतिनिधींनी विविध समस्या प्रशासनासमोर मांडल्या. अनेक ठिकाणी महामार्गाच्या कामामुळे शेतात जाण्याचे मार्ग बंद झाल्याची, पावसाचे पाणी घरांमध्ये व शेतात साचत असल्याची, अपुऱ्या ड्रेनेज व्यवस्थेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तसेच सेवा रस्ते व सुरक्षित क्रॉसिंगची गरज असल्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार किरण सामंत यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, तसेच महामार्गाचे काम करताना स्थानिकांच्या अडचणींचा विचार करून आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

टाईम्स स्पेशल

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही सर्व विभागांमध्ये समन्वय साधून ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ज्या प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेता येईल त्यावर विलंब न करता कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच उर्वरित प्रकरणांचा पाठपुरावा करून निश्चित कालमर्यादेत मार्ग काढण्याचे निर्देशही देण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रभावित गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या समस्या थेट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त केले. या बैठकीमुळे मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg