loader
Breaking News
Breaking News
Foto

‘ग्रीन देवगड – ऊर्जा स्वयंपूर्ण देवगड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी, भाजप कार्यकर्ते निनाद देशपांडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

देवगड - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुका हा अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत पोषक असल्याने येथे ‘ग्रीन देवगड – ऊर्जा स्वयंपूर्ण देवगड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद देशपांडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात देवगड तालुक्यात उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणातील मोकळ्या जमिनीचा आणि विद्यमान पवन ऊर्जा प्रकल्प परिसराचा प्रभावी वापर करून सुमारे ४ ते ५ मेगावॅट क्षमतेचा हायब्रिड (पवन + सौर) ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. अशा प्रकल्पातून वर्षभर सातत्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक वीज निर्मिती होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा एक आदर्श हरित ऊर्जा प्रकल्प ठरू शकतो, असे नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकल्पामुळे देवगड तालुक्याच्या वीज गरजांचा मोठा भाग स्थानिक पातळीवर पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच स्वच्छ ऊर्जा निर्मितीला चालना मिळून राज्य व केंद्र शासनाच्या हरित ऊर्जा धोरणालाही बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय प्रकल्पाच्या उभारणी, संचालन, देखभाल व इतर पूरक सेवांमधून सुमारे २०० स्थानिक युवक-युवतींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच युवकांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

देवगडमध्ये मोठ्या प्रमाणावर हरित वीज निर्मिती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नागरिक आणि उद्योगांना वीज दरात विशेष सवलत किंवा प्रोत्साहनपर योजना लागू करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना थेट लाभ मिळण्यासह औद्योगिक विकासालाही गती मिळेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी विनंती निनाद देशपांडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली असून, या प्रकल्पामुळे देवगड तालुका राज्यासाठी हरित ऊर्जा क्षेत्रातील आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg