loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरळच्या महिला मंडळाने गणेशोत्सवात जपली टिपरी नृत्याची समृद्ध लोकपरंपरा; अनेक ठिकाणी सादरीकरणाने रंगली उत्सवाची मैफल

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि त्यात टिपऱ्यांचा ठेका... अशा भारलेल्या वातावरणात तुरळ बामणेवाडीतील महिला मंडळाने टिपरी नृत्यकलेचा जागर करत गणेशोत्सवात पारंपरिक लोककलेची वेगळीच रंगत आणली. गणेशोत्सवाच्या काळात बामणेवाडीतील महिलांनी एकत्र येत अनेक ठिकाणी टिपरी नृत्याचे सादरीकरण केले. हातात टिपऱ्या घेऊन तालबद्ध पावले टाकताना महिलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि टिपऱ्यांच्या खणखणाटाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक चाली, लयबद्ध हालचाली आणि सामूहिक सादरीकरणामुळे प्रत्येक कार्यक्रमाला उत्सवी रंग चढला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोबाईल, डीजे आणि आधुनिक मनोरंजनाच्या झगमगाटातही आपल्या मातीतली लोककला विसरायची नाही, हा संदेशच बामणेवाडीतील महिलांनी आपल्या सादरीकरणातून दिला. केवळ नृत्य म्हणून नव्हे, तर पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली सांस्कृतिक ओळख म्हणून या महिलांनी टिपरीकलेकडे पाहिले आहे. गणेशोत्सवातील कार्यक्रम असो वा गावातील सांस्कृतिक सोहळा—टिपऱ्यांचा ठेका सुरू झाला की वातावरणात उत्साह संचारतो. बामणेवाडीतील महिलांच्या या उपक्रमामुळे पारंपरिक टिपरी नृत्याला पुन्हा एकदा व्यासपीठ मिळाले असून, नव्या पिढीतील मुलींनाही या लोककलेची गोडी लागण्यास हातभार लागत आहे. गणरायाच्या चरणी भक्तीचा जागर सुरू असतानाच, टिपऱ्यांच्या तालावर कोकणच्या संस्कृतीचा ठेका घुमवून बामणेवाडीच्या महिलांनी लोककलेची परंपरा जिवंत ठेवली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg