loader
Breaking News
Breaking News
Foto

संस्कृत आणि संस्कृतीचे जतन अत्यावश्यक- शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

रत्नागिरी (जमीर खलफे) - संस्कृत भाषा ही केवळ एक विषय नसून ती एक संस्कृती आहे. त्यावर संस्कार अवलंबून असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन करणे खूप महत्त्वाचे आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार रुजवले पाहिजेत. आजच्या काळात शिक्षण हे केवळ करिअर किंवा नोकरीपुरते मर्यादित राहिले आहे, ज्यामुळे अनेकदा इतर विषयांकडे दुर्लक्ष होते. संस्कृत शिक्षक मंडळ संस्कृत प्रसारासाठी व विद्यार्थी, शिक्षकांसाठी सक्रिय राहत कृतिसत्र व उपक्रम राबवत आहे, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या सहकार्याने गोगटे महाविद्यालयात आयोजित संस्कृत कृतिसत्र समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य व संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, सावंतवाडीच्या वेदशाळेचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर, संस्कृत मंडळाच्या अध्यक्ष स्मिता सरदेसाई, शोभा जाधव, मंदार बापट आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, शिक्षण हे आनंददायी व्हावे. यापूर्वी मातृभाषेतून संस्कृत शिकवले जात होते. आता संस्कृतमधून संस्कृत शिकवण्यावर भर दिला जात आहे. संवादातून भाषा शिक्षण जीवंत आणि आनंददायी होते. विद्यार्थ्यांनी संस्कृत ऐकले पाहिजे यासाठी उपक्रम राबवूया. दर महिन्याला संस्कृत शिक्षकांची ऑनलाईन बैठक घेऊन मार्गदर्शन सत्र आयोजित करता येऊ शकते. प्रमुख पाहुणे राजाराम चिपळूणकर म्हणाले की, आजकाल सभोवताली चुकीच्या प्रथा, परंपरा पाहत आहोत त्या बदलून युवा पिढीला दिशा देण्याकरिता संस्कृत, संस्कार आणि संस्कृतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे संस्कृत बोला व सर्वांना शिकण्यास प्रवृत्त करा. संस्कृत भारती संस्था चांगले काम करत आहे. तसेच संस्कृत शिक्षक मंडळाने चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. आमच्या वेद संस्थेतील पदाधिकाऱ्यांनीही वर्षभरात संस्कृतमधून संवाद साधण्याचा संकल्प केला आहे.

टाईम्स स्पेशल

पहिल्या टप्प्यात रत्नागिरी शहरांतील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी संस्कृतमधून गीतगायन, नृत्य, नाटिका आदी कार्यक्रम सुरेख सादर केले. मंडळाच्या अध्यक्ष स्मिता सरदेसाई यांनी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त संस्कृत शिक्षिकांचा सन्मान, नवीन संस्कृत शिक्षकांचे स्वागत आणि इयत्ता दहावीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. जिल्ह्यातून ५० हून अधिक संस्कृत शिक्षक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता योगदान दिल्याबद्दल स्मिता सरदेसाई, वीणा काजरेकर यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. प्रज्ञा भट, प्रीती टिकेकर, मीनाक्षी तेरेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. सुमंत भिडे यांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg