loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहराची हुबेहूब प्रतिकृती ठरतेय माजगावमधील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण; तरुणाईच्या कल्पकतेवर कौतुकाचा वर्षाव

सावंतवाडी, (प्रतिनिधी): सुंदरवाडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या सावंतवाडी शहराची हुबेहूब प्रतिकृती यंदा श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने माजगाव येथील तरुणाईने साकारली आहे. माजगाव म्हालटकरवाडा येथील रहिवासी साहिल सावंत यांच्या घरी विराजमान झालेल्या श्रींच्या सजावटीसाठी ही अप्रतिम कलाकृती तयार करण्यात आली आहे. साहिल सावंत यांच्यासह स्थानिक तरुण-तरुणींनी एकत्र येत गेल्या २५ दिवसांच्या अथक मेहनतीतून ’टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेवर आधारित हे मॉडेल साकारले आहे. या देखाव्यात सावंतवाडीची ऐतिहासिक ओळख असलेले ठिकाणे अत्यंत बारकाईने दाखवण्यात आली आहेत. यामध्ये सावंतवाडीचा ऐतिहासिक राजवाडा, मोती तलाव, आणि नगरपरिषद यांसारख्या महत्त्वाच्या वास्तू आणि परिसराची हुबेहूब चित्रे व मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संपूर्ण देखाव्यात तरुणाईची अप्रतिम कल्पकता आणि कलागुण दिसून येत आहेत. सध्या या देखाव्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकर्‍यांकडून या तरुणाईचे मोठे कौतुक केले जात आहे. सावंतवाडी शहराची ही अनोखी प्रतिकृती आणि आकर्षक सजावट पाहण्यासाठी माजगावसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. तरुणाईच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे परिसरातील गणेशोत्सवाचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला आहे. या देखाव्यामध्ये सावंतवाडीतील लाकडी खेळणी, राजवाडा ,मोती तलाव, रामेश्वर प्लाझा ,विठ्ठल मंदिर अशी ठिकाणे या डेकोरेशन मध्ये दाखवून माजगाव हे गाव सावंतवाडी मध्ये वसलेले आहे त्यासाठी माजगाव सावंतवाडी रस्ता दाखविलेला आहे.

टाईम्स स्पेशल

या सजावटीमध्ये सर्व इकोफ्रेंडली वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामध्ये पुठ्ठे, कागद, माती, लाकडाचा भुसा, इत्यादी साहित्याचा वापर करून टाकाऊपासून टिकाऊ उपयोगी करण्यात आला आहे. या डेकोरेशनसाठी गणपती अगोदर २० ते २५ दिवस कुटुंबातील साहिल, तन्वी, वैष्णवी, पूर्वा, विनय, युवराज, संजना, सुमित, शुभम व कुटुंबातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतलेली आहे. गणपती व सजावट पाहण्यासाठी गेले अकरा दिवस गावातील सर्व ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, गोवा येथील भाविकांनीही गणपतीचे दर्शन घेऊन छान सजावटीसाठी साहिल सावंत व त्यांच्या कुटुंबालाही शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg