loader
Breaking News
Breaking News
Foto

पुर्ये तर्फे देवळे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार; शेतकऱ्याचे मोठे नुकसान, वनविभागाने तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे धनगर वाडीतील शेतकरी सखाराम आब्या कोलापटे यांची पाळीव गाय बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आंब्याचा माळ गवळी वाडी परिसरात ही घटना घडली असून, दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सखाराम कोलापटे हे नेहमीप्रमाणे आपली गुरे चरण्यासाठी जंगलातील आंब्याचा माळ परिसरात घेऊन गेले होते. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक एका गायीवर झडप घातली. बिबट्याच्या या भीषण हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली आणि काही क्षणांतच तिने जागीच प्राण सोडले. या घटनेमुळे बाधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच बापू लोटणकर यांनी तत्परता दाखवत स्थानिक आमदार किरण सामंत यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आमदार कार्यालयाने तातडीने दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

टाईम्स स्पेशल

यानंतर दाभोळेच्या वनरक्षक सुप्रिया काळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. तसेच बाधित शेतकरी सखाराम कोलापटे यांना वनविभागाच्या नियमांनुसार शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती आर्थिक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी उपसरपंच बापू लोटणकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे, वनरक्षक सुप्रिया काळे आणि रमेश बावदाने उपस्थित होते. दरम्यान, भरदिवसा मानवी वस्तीनजीक बिबट्याने जनावरावर हल्ला केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे सावट असून वनविभागाने परिसरात गस्त वाढवून या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg