loader
Breaking News
Breaking News
Foto

सत्कोंडी नगरीत रंगणार कवितेचा जागर! नवकवींच्या सर्जनशीलतेला मिळणार साहित्यिक दिशा; १४ ऑक्टोबरला कवितालेखन कार्यशाळा

रत्नागिरी: ( संतोष कांबळे) नव्या पिढीतील कवींना कवितेच्या निर्मितीप्रक्रियेची ओळख करून देत त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य दिशा, चिकित्सक दृष्टी आणि अभिव्यक्तीचे भान देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथील स्व. अनंतरावजी बैकर बहुउद्देशीय संकुल येथे नवकवींसाठी कवितालेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई आणि ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय, सत्कोंडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही एकदिवसीय कार्यशाळा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबईचे उपाध्यक्ष तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सत्कोंडीचे सरपंच सतीश थुळ असतील. कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन तथा आबा पाटील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगेसर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.रत्नागिरीतील आद्य गजलकार देवीदास पाटील हे ‘कविता लिहिताना : माझा लेखनप्रवास व अनुभव’, कवी राजू सुर्वे हे ‘गझल : तंत्र, लय आणि आशय’, मराठी भाषा समितीचे सदस्य तथा समीक्षक प्रा. शिवराज गोपाळे हे ‘कविता घडते कशी? निर्मिती, वाचन आणि समीक्षा’, तर युवासाहित्यिक अरुण मोर्ये हे ‘अनुभवातून कविता : शब्द, प्रतिमा आणि संवेदना’ या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. केवळ व्याख्यानांपुरती मर्यादा न ठेवता, कार्यशाळेच्या अखेरीस नवकवींना प्रत्यक्ष कविता लेखनाचा सराव करण्याची संधीही मिळणार आहे. त्यामुळे कवितेच्या सिद्धांतासोबतच प्रत्यक्ष लेखनकौशल्य विकसित करण्यावर प्रशिक्षक अरुण मोर्ये व राजू सुर्वे यांचेकडून भर दिला जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

या कार्यशाळेसाठी सहभागी होणारा उमेदवार (नवकवी) किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यापूर्वी ज्यांचे कवितेचे एकही पुस्तक प्रकाशित झालेले नाही, मात्र ज्यांना वाङ्मयाची आवड आहे आणि लेखनप्रक्रियेचा अभ्यास करण्याची इच्छा आहे, अशा नवकवींना या कार्यशाळेत सहभागी होता येईल. कार्यशाळा पूर्णतः निःशुल्क असून प्रवेश मर्यादित ३० जागांसाठी असेल. यामध्ये एक दिव्यांग पुरुष आणि एक दिव्यांग महिला यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव ठेवण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक नवकवीला सहभाग प्रमाणपत्र आणि लेखणी देऊन गौरविण्यात येणार आहे. समारोपप्रसंगी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे जिल्हा निरीक्षक हेमंत काळोखे, वाटद जिल्हा परिषद सदस्या उषाताई सावंत, पंचायत समिती सदस्या संजनाताई माने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.नव्या शब्दांना नवी दृष्टी, नव्या जाणिवांना अभिव्यक्ती आणि नव्या कवींना साहित्यनिर्मितीचा आत्मविश्वास देणारा हा उपक्रम सत्कोंडीच्या साहित्यिक-सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या कार्यशाळेमुळे नवोदित कवींना केवळ कविता लिहिण्याची प्रेरणा मिळणार नाही, तर आपल्या लेखनाकडे चिकित्सकपणे पाहण्याची आणि त्याला आशयसमृद्ध बनवण्याची दृष्टीही मिळेल, अशी अपेक्षा ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर यांनी व्यक्त केली.नावनोंदणी व अधिक माहितीसाठी अजय काताळे — ८०८७८६७१८२ , नितीन जाधव — ८२७५४३१२९८, संजय बंडबे — ७५४४९९१७५९ , निलेश थुळ — ८७८८७४११९७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg