loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत प्रथमच अखिल मराठा समाजाचे महासंमेलन

महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठा मंडळे किंवा त्यांच्या संस्था यांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने दि. १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी शनिवारी व रविवारी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयातील या समाजात नवचैतन्याची लाट निर्माण झालेली दिसून येते. या महासंमेलनाचे सहआयोजकत्व रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ या येथील दोन जाणत्या मंडळानी स्विकारलेले आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या मराठा समाजाच्या अगदी शहर आणि गावपातळीवरील संघटना आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते महासंमेलनाला उपस्थित रहाणार आहेत. चिपळूणमधील मराठा महाकुटूंब आणि गोव्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज या संघटनाही सहभागी झालेल्या आहेत. रत्नागिरीमध्ये आज पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या वेळी मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, राकेश नलावडे, अप्पा देसाई व प्राची शिंदे यांनी दिली. अखिल मराठा फेडरेशन हे मराठा समाजाच्या व्यापक हिताचा विचार करून मराठा समाजासाठी ज्यांनी गेली साठ वर्षे अविश्रांत सेवा केली त्या मराठा समाजातील थोर आणि सर्वमान्य असे नेते कै. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेव पवार यांनी स्थापन केलेले आहे. कै. आप्पासाहेब हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष व मुंबईच्या मराठा मंदिर संस्थेचे सरचिटणीस राहिलेले होते. तसेच त्यांनी असाही विचार केला की मराठा समाजाने यापुढे नोकरी मागणारे न रहाता नोकरी देणा-याच्या भूमिकेत जायला पाहिजे व त्यासाठी मराठा समाजासाठी ’मराठा बीझिनेसमेन फोरम’ ची स्थापना केली. अखिल मराठा फेडरेशन हे महाराष्ट्रातील विविध जिल्हयांतील मराठा समाजात ऐक्य निर्माण करणे, समाजाचे संघटन करून त्यांना सक्षम बनविण्यासाठी मार्गदर्शन करणं, सामाजिक आणि शैक्षणिक हितवर्धनासाठी समाजाला विविध संधी उपलब्ध करून देणे, समाजातील नामवंताना पुरस्कार देऊन गौरविणे इ. उपक्रम राबवित असते. यासाठी मराठा समाजाची विविध ठिकाणी फेडरेशन संमेलने आयोजित करीत असते. फेडरेशनची पहिली दोन संमेलने ही मुंबई आणि ठाणे येथे झालेली असून तिसरे संमेलन हे आता रत्नागिरीत भरत आहे. रत्नागिरी येथील महासंमेलन हे दोन दिवसांचे असून त्याचा शुभारंभ दि. १८ रोजी शनिवारी सकाळी ठीक १० वाजता शिवछत्रपतींचे वंशज कोल्हापूरचे छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे पूर्वमुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे व महाराष्ट्राचे पूर्वमुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्हयातील नवनिर्वाचित मराठा आमदार सर्वश्री निलेश राणे, शेखर निकम, भास्करशेठ जाधव, निरंजन डावखरे व नूतन मंत्रीमहोदय ना. नितेश राणे व ना. योगेश कदम यांचा मराठा समाजातर्फे भव्य सत्कार केला जाणार आहे. या महासंमेलनासाठी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव व सारथीचे विद्यमान अध्यक्ष अजितराव निंबाळकर आणि कर्नाटक राज्याचे मुख्य सचिवपद भुषविलेले अविनाश जाधव हे दोन्ही मराठा समाजातील वरिष्ठ आय. एस. अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. या महासंमेलनात मराठा समाजातर्फे ज्या मराठा मान्यवरांनी समाजात त्यांच्या कार्यसिद्धीमुळे नाव कमावलेले आहे अशा नामवंतांचा फेडरेशनचे मानाचे पुरस्कार देऊन त्याना गौरविले जाणार आहे. मराठा समाजाचा ज्वलंत असा आरक्षणाचा प्रश्न ज्यानी पहिल्या प्रथम हाताळला व अत्यंत कमी वेळात मराठा समाजाचे सर्वेक्षण करून मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोक-यांमध्ये १६ टक्के आरक्षण मिळवून दिले त्या खासदार नारायणराव राणे यांना आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हे गेलेले आरक्षण पुन्हा एकदा १० टक्के असे मिळवून दिले अशा विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे याना, या त्यांच्या असामान्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून दि ग्रेट मराठा’ हा आगळावेगळा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. मराठयांच्या इतिहासाचे परदेशी साधने नव्याने अभ्यासून ज्यांनी संशोधन केले त्या वयोवृद्ध अशा डॉ. जयसिंगराव पवार यांना ’अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तसेच ’अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार इतिहासकार डॉ. इंद्रजीत सावंत, अणुशास्त्रज्ञ व गरिबासाठी नॅनो हाऊसिंगवर संशोधन करणारे डॉ. सुरेश हावरे यांना दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे याप्रसंगी खासकरून उपस्थिती लाभलेले मराठा समाजातील आयएएस अधिकारी ज्यांनी महाराष्ट्राचे चिफ सेक्रेटरी पद भुषविलेले असून आता ’सारथी’ चे अध्यक्ष असलेले अजितराव निंबाळकर तसेच कर्नाटक राज्याचे चिफ सेक्रेटरी पद भुपविलेले अविनाश जाधव यांनाही ’अखिल मराठा समाज भूषण’ हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे. मुळचे रत्नागिरी जिल्हयातील असून ज्यांनी ऍडव्हान्स सिव्हिल इंजिनिअरींगमध्ये प्राविण्य मिळविलेले असून जे पीटी स्लॅब मधील एक्स्पर्ट म्हणून ओळखले जातात त्या उमेश भुजबळराव यांना ’अखिल मराठा समाज गौरव’ हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

टाइम्स स्पेशल

अखिल मराठा फेडरेशन व मराठा बीझनेसमेन फोरमचे संस्थापक अध्यक्ष व ज्यांनी आपले उभे आयुष्य मराठा समाजाच्या विकासासाठी वाहिलेले होते त्या कै. शशिकांतजी उर्फ आप्पासाहेब पवार याना या महासंमेलनात मराठा समाजातर्फे मरणोत्तर ’जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. या दोन दिवसांच्या अखिल मराठा महासंमेलनाला समस्त मराठा समाजाने उपस्थित रहावे अशी विनंती फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सुरेशराव सुर्वे हे करीत असून यानिमित्त जी चर्चासत्रे समाज प्रबोधनासाठी आयोजित केलेली आहेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन समाजाला आणि खास करून तरूण मराठा वर्गाला केलेले आहे. शनिवार दिनांक १८ जानेवारीला दुपारी पहिले चर्चासत्र हे ’इतिहासाच्या कोंदणातून वेध मराठ्यांच्या भविष्याचा’ या विषयावर असून दुसरे चर्चासत्र हे संध्याकाळी मराठा समाजाला उद्योगव्यवसायाकडे वळविण्यासाठी आहे त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन रात्री करण्यात आले आहे. दुस-या दिवशी दि. १९ जानेवरीला रविवारी तिसरे चर्चासत्र हे ’आजची जिजाऊ’ या विषयावर मराठा महिला वर्गासाठी आहे. चौथे चर्चासत्र हे ’अभियान उद्योजकतेचे’ या विषयावर आहे. या चारही सत्रांतून मराठा समाजाला तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. फेडरेशनने या दोन्ही दिवशी भोजनाची व न्याहारीची तसेच चहापाण्याचीही खास व्यवस्था केलेली आहे. तसेच या महासंमेलनाच्या निमित्ताने अखिल मराठा फेडरेशनच्या व सहआयोजक क्षत्रिय मराठा मंडळाच्या वेबसाईटचे उद्घाटन केले जाणार असून यानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांचे हस्ते केले जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts