loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत आजपासून अखिल मराठा समाजाचे महासंमेलन; स्वागतासाठी रत्ननगरी सजली, उत्साहाला उधाण

रत्नागिरी (वार्ताहर) :- अखिल मराठा फेडरेशनच्यावतीने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस रत्नागिरीत होत असलेल्या अखिल मराठा महासंमेलनासाठी रत्ननगरी सज्ज झाली असून देशभरातून येणार्‍या समाजबांधवांच्या स्वागताची जय्यत तयारी आयोजकांनी केली आहे. शनिवारी १८ जानेवारीला या संमेलनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री व विद्यमान खा. नारायण राणे यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. तर रविवारी होणार्‍या सांगता समारंभासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. दि. १८ व १९ जानेवारी रोजी हे महासंमेलन रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे संपन्न होणार आहे. या महासंमेलनाचे सहआयोजकत्व रत्नागिरीतील क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ या येथील दोन जाणत्या मंडळानी स्विकारलेले आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील मराठा समाजाच्या शहर आणि गावपातळीवरील संघटनांचे सर्व कार्यकर्ते महासंमेलनाला उपस्थित रहाणार आहेत. चिपळूणमधील मराठा महाकुटूंब आणि गोव्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज या संघटनाही सहभागी झालेल्या आहेत. महासंमेलनाची सारी तयारी पूर्ण झाली असून पाहुण्यांच्या स्वागतासाठी रत्ननगरी सजली आहे. सर्वत्र भगवे झेंडे लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शनिवारी १८ जानेवारीला सकाळी १० वाजता महासंमेलनाचे उद्घाटनासाठी छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग मंत्री ना. नितेश राणे, गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांच्यासह गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव, कुडाळचे आमदार निलेश राणे, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, कर्नाटकचे माजी मुख्यसचिव अरविंद जाधव आणि प्रसिध्द उद्योजक व अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे हेदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटन समारंभानंतर शनिवारी दुपारी ३.३० वा. ‘इतिहासाच्या कोंदणातून वेध मराठ्यांच्या भविष्याचा’ या विषयावर पहिले चर्चासत्र होणार आहे. मुंबईतील झुंझुनवाला महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक डॉ. कमलाकर इंदुलकर, जेष्ठ विधिज्ञ ऍड. सतिश मानेशिंदे, प्रभावी वक्ते, विचारवंत डॉ. अजय दरेकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, माजी आयकर सहआयुक्त डॉ. उज्वलकुमार चव्हाण हे या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. तर शनिवारी सायंकाळी ५.३० वा. मराठा बिझनेसमन फोरम मिशन उद्योग या विषयावरील चर्चासत्रात अरूण पवार, अरविंद जाधव, डॉ. सुरेश हावरे, ऍड. सतिश मानेशिंदे, राजेंद्र सावंत, राजेंद्र घाग, ऍड. उज्वल चव्हाण, केतन गावण, पंकज घाग हे मान्यवर सहभागी होतील. रात्रौ ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारीसुध्दा दिवसभर विविध चर्चासत्रे होणार आहेत. रविवारी १९ जानेवारीला महासंमेलनाच्या दुसर्‍या दिवशी २ चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १२ वा. होणार असून ‘आजची जिजाऊ’ कर्तबगार मराठा महिला आणि त्यांच्यापुढील आव्हाने या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यामध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीम. अस्मिता मोरे-भोसले, श्रीम. कविता पाटील, मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयातील नामवंत डॉक्टर ज्योती शिंदे, श्रीम. राधिका बराले आणि रत्नागिरीच्या डॉ. स्वराली शिंदे या सहभागी होणार आहेत. तर रविवारी दुपारी १२ वा. ‘अभियान उद्योजकतेचे’ या महत्वाच्या विषयावर चर्चासत्र होणार असून त्यामध्ये उमेश भुजबळराव, श्रीम. उज्ज्वला साठे, प्रफुल्ल तावरे, केतन गावड, राजेेंद्र घाग, सुरेश कदम आदी मान्यवर सहभागी होतील.

टाइम्स स्पेशल

रविवारी १९ जानेवारीला चर्चासत्र संपल्यानंतर दुपारी ३ वा. या महासंमेलनाचा सांगता सोहळा होणार असून त्याचे अध्यक्षस्थान गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भूषवितील. सावंतवाडी संस्थानचे युवराज श्री. लखमसिंह राजे भोसले, राजे कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांच्यासह शिवव्याख्याते नामदेवराव जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून या सांगता सोहळ्याला उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांनी दिली. या २ दिवसाच्या महासंमेलनाची सर्व तयारी पूर्ण झाली असून रत्ननगरी येणार्‍या मान्यवरांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मराठा समाजबांधवांमध्ये उत्साह दिसत असून हे अधिवेशन भव्यदिव्य करण्यासाठी आयोजक प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत. या महासंमेलनाच्यानिमित्ताने समाजातील अनेक कर्तबगार व्यक्तीमत्वांचा पुरस्कार देवून गौरव होणार आहे. त्यामध्ये मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठा महासंघ, अखिल मराठा फेडरेशन आणि मराठा बिझनेसमन फोरमचे संस्थापक कै. शशिकांत उर्फ अप्पासाहेब पवार यांना जाहीर करण्यात आला आहे. मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांचा दि ग्रेट मराठा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. अखिल मराठा समाजरत्न पुरस्कार जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना देण्यात येणार आहे. अखिल मराठा समाजभूषण पुरस्काराने उद्योजक आणि अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यसचिव अजितराव निंबाळकर यांचा तसेच कर्नाटकचे माजी मुख्यसचिव अरविंद जाधव आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना गौरविण्यात येणार आहे. अखिल मराठा समाज गौरव पुरस्काराने ऍडव्हान्स इंजिनिअरींग तज्ञ उमेश भुजबळराव यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts