loader
Breaking News
Breaking News
Foto

डम्पिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी ग्रामस्थांना सोबत घेवूनच करावी अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा कोत्रेवाडी ग्रामस्थांचा इशारा

लांजा (वार्ताहर) : जिल्हाधिकार्‌यांच्या सूचनेनुसार फेरतपासणी अधिकारी तथा राजापूर तहसीलदार यांनी कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड (क्षेपणभूमी) प्रकल्प जागेची प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करणे अपेक्षित असताना केवळ लांबूनच नजर पाहणी करण्यात आल्याने फेरतपासणी करण्याचा शासनाकडून केवळ दिखावा केला जात आहे का? असा सवाल कोत्रेवाडी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार डम्पिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी ही ग्रामस्थांना सोबत घेवूनच करावी अन्यथा या विरोधात तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील कोत्रेवाडी येथे वस्तीलगत लांजा नगरपंचायतीमार्फत डम्पिंग ग्राउंड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही शासनाचा अधिकृत रस्ता नाही. तसेच जलस्रोत देखील जवळ आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकल्पाची जागा ही शासनाच्या २०१६ च्या निकषात बसत नाही अशा आशयाचे पत्र देखील दिलेले आहे. असे असतानाही लांजा नगरपंचायतीकडून हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अगोदर ग्रामस्थ आणि जिल्हाधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली होती. या बैठकीनंतर जिल्हा सह आयुक्त, रत्नागिरी तुषार बाबर यांनी या प्रकल्पाच्या जागेची फेरतपासणी करण्याचे पत्र राजापूर तहसीलदार यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २३ जानेवारी रोजी लांजा कोत्रेवाडीतील ग्रामस्थांनी राजापूर तहसीलदार यांची भेट घेतली. सदर प्रकल्प हा आमच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. या प्रकल्पाकडे जाण्यासाठी कोणताही शासकीय अधिकृत रस्ता नाही. तसेच जलस्त्रोत देखील जवळ आहेत. त्याचप्रमाणे सदर संपूर्ण जागेची भूमि अभिलेख कार्याकडून मोजणी करण्यात आलेले नाही. हद्दी खुणा दाखविण्यात आलेल्या नाहीत. अशा बाबी ग्रामस्थांनी तहसिलदार विकास गमरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र राजापूर तहसीलदार विकास गमरे यांनी सांगितले की, मी गुरुवारी २२ जानेवारी रोजी सायंकाळी या जागेचे पाहणी केली आहे. मात्र यावेळी ग्रामस्थांनी आपण प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली आहे का? असा सवाल केला. यावर आपण दुरूनच ही पाहणी केली असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितल्याचे ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांच्या आग्रही मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तहसीलदार यांनी पुन्हा एकदा फेरतपासणी करावी. यासाठी याचिकाकर्त्या सर्व ग्रामस्थांना सोबत घेवूनच या जागेची प्रत्यक्ष फेरतपासणी करावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आपणास शक्य झाले तरच आपण जावू असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले असल्याचे कोत्रेवाडी ग्रामस्थांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

अशाप्रकारे डंपिंग ग्राउंडच्या जागेची फेरतपासणी प्रत्यक्ष जागेवर जावून न करताच दुरूनच त्याची जर पाहणी केली जात असेल तर ती शासनाकडून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे. यापूर्वी राज्य निवडणूक निरीक्षक पोलीस राजेंद्र प्रसाद मिना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी या प्रकल्पाच्या जागेची ग्रामस्थांसोबत स्थळ पाहणी करून ग्रामस्थांची भूमिका योग्य असल्याचे सांगितले होते. त्याचप्रमाणे जिल्हा निवड समितीने २०२१ मध्ये कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंड जागेची पाहणी करून सदर जागा अयोग्य असल्याचे दिलेले पत्र देखील ग्रामस्थांनी तहसिलदार यांना दाखविले असता ते त्यांनी न स्विकारल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे जर ग्रामस्थांच्या मागणीनुसार जर योग्य प्रकारे तपासणी किंवा चौकशी केली जात नसेल तर या विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts