परग्रहावरील जीव अस्तित्वात आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर अजून तरी मानवला सापडलेलं नाही. मात्र या प्रश्नाच्या उत्तरावर दुमत आहे हे मात्र नक्की. मात्र पृथ्वीबाहेरील विश्वात अद्याप तरी जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे मानवाला सापडलेले नाहीत. तरीही अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे परग्रहांवरील जीवसृष्टी हा विषय चर्चेत असतो. सध्या अमेरिकेतील एका रिपब्लिकन खासदाराने केलेल्या वक्तव्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना अमेरिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींपैकी एक असलेल्या टीम ब्रुशेट यांनी परग्रहावरील जीव हे अवकाशात किंवा अंतराळात नसून पृथ्वीवरील समुद्रांच्या तळाशी असल्याचं म्हटलं आहे. पाण्याखाली या जीवांची विमाने अत्यंत वेगाने प्रवास करतात असं आपल्याला एका लष्करी अधिकार्याने सांगितल्याचा दावाही टीम ब्रुशेट यांनी केला आहे. त्यांनी या अधिकार्याच्या नावाचा खुलासा केलेला नाही.
अमेरिकेतील टेनेसी राज्यातील लोकनियुक्त प्रतिनिधी असलेल्या ब्रुशेट यांनी यापूर्वीही युएफओबद्दल मुक्तपणे भाष्य केलेलं आहे. परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल अमेरिकी सरकारकडे गुप्त माहिती असून ही माहिती जाणूनबुजून सार्वजनिक करण्यात आलेली नाही, असं ब्रुशेट यांचं म्हणणं आहे. मॅट गार्त्झ या माजी खासदाराच्या कार्यक्रमामध्ये दिलेल्या मुलाखतीत ब्रुशेट यांनी परग्रहावरील जीवसृष्टीसंदर्भात ही विधानं केली आहेत. पाण्याखाली शेकडो किलोमीटर प्रति तास वेगाने कोणत्यातरी रहस्यमय गोष्टी प्रवास करत असल्याचं त्यांनी मला सांगितलं आहे. या वस्तूंचा आकार एखाद्या फुटबॉलच्या मैदानाएवढा आहे. या प्रकरणाची नोंदही करण्यात आली आहे. मला एका ऍडमिरलने हे सांगितलं आहे, असा दावा ब्रुशेट यांनी केला आहे. याच कार्यक्रमामध्ये मुलाखतकार मॅट यांनी अनेकदा युएफओ हे पाण्यावरच दिसून येत असल्याचं निर्देशित करताना पहायला मिळाले. हाच संदर्भ देत पाण्याखाली खरोखरच परग्रहावरील जीव राहतात हा दावा पटतो का असा प्रश्न मॅट यांनी ब्रुशेट यांना विचारला. विश्वाचा पसारा पाहता काहीही शक्य आहे, असं उत्तर ब्रुशेट यांनी दिलं. पाण्याखाली परग्रहावरील जीवांचे तळ असतील अशी शक्यताही ब्रुशेट यांनी व्यक्त केली.
तसेच परग्रहावरील जीवांना घाबरण्याची गरज नसल्याचंही ब्रुटेश म्हणाले. ते आपल्याला इजा पोहचवतील याबद्दल मला चिंता वाटत नाही. कारण त्यांच्याकडे जी क्षमता आहे त्याचा विचार केल्यास त्यांनी आपल्याला यापूर्वीच संपवलं असतं, असं विधान ब्रुशेट यांनी केलं आहे. २०२३ मध्ये अमेरिकी एअरफोर्सच्या गुप्तचर विभागातील अधिकार्याने अमेरिकी सरकारकडे परग्रहावरील जीवांचा मृतदेह असल्याचा दावा केला होता. पेंटागॉनने हा दावा खोटा असल्याचं म्हटलं होतं.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.