दापोली :- तालुक्यातील केळशी, उटंबर गावाला लाभलेला समुद्र किनारा अत्यंत रम्य असून चारी बाजूंनी नारळ पोकळीची बागायत आहे. या गावात हिंदू - मुस्लिम गुण्यागोविंदाने व सालोख्याने एकत्र राहतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी आपले गुरु याकूब बाबा यांना दिलेली जागा अत्यंत रमणीय व उंच टेकडीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे याकूब बाबा यांना आपले गुरु मानत. सिंध हैद्राबादकडून सुमारे चारशे वर्षांपूर्वी हजरत पीर याकूब बाबा हे दाभोळ बंदरामार्गे फिरत फिरत केळशीला आले. अंगावर फाटके वस्त्र, कफनी, शुभ्र दाढी अशी सहा फूट उंचीची व्यक्ती होती. त्यांच्याबरोबर दहा - बारा वर्षांचा चेला हिम्मतखान होता. केळशी येथील हिरजी गुजर नावाच्या व्यापाऱ्याने हा कोणी अवलिया असावा हे ओळखून आपल्या घरी राहण्यासाठी त्यांना जागा दिली व त्यांची सेवा करू लागला. त्याचा फायदा गुजर व्यापाऱ्याला झाला. बाबा आपल्या चेल्याला घेऊन संपूर्ण गाव, समुद्र फिरत व भक्तीत मग्न राहत मुसलमानांप्रमाणे हिंदू ही त्यांचे भक्त झाले. सर्वधर्मसमभाव व माणुसकी यामुळे ते पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. बाबा आपल्याच नादात फिरत. वेळप्रसंगी हमाली करत, ओझी उचलत. त्यावेळी ही ओझी त्यांच्या डोक्यावर आधांतरीत राहत. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आपला मोर्चा दाभोळकडे वळवला त्यावेळी दाभोळवर विजापूरचा अंमल होता. बाबांची कीर्ती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली व ते या थोर अवलियाला (बाबांना) भेटण्यासाठी स्वतः केळशीला आले. बाबांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला सर्व तयारी फुकट जाण्यापेक्षा प्रयत्न करून पाहण्याचे राजाने ठरवले. शेवटी राजांचा आरमारी तांडा वादळात सापडून नष्ट होण्याची वेळ आली तेव्हा त्यांना बाबांचे शब्द आठवले व त्यांनी आपला बेत रद्द करून परतले व बाबांचे दर्शन घेऊन आपणास यश मिळावे यासाठी बाबांना प्रार्थना केली. त्याप्रमाणे महाराजांना पुढे आपल्या कामात यश आले व संपूर्ण दाभोळ प्रांत त्यांनी काबीज केला.
महाराजांनी बाबांना दर्गा बांधण्याकरिता जागा पसंत करण्याची विनंती केली पण बाबा म्हणाले माझा दर्गा बांधून पूर्ण करणे तुला शक्य होणार नाही. महाराज बाबांना आपले अकरावे गुरु मानत. याकूब बाबांच्या दर्ग्याचे काम खुद्द शिवाजी महाराजांनी आपल्या हजेरीत करून घेतले. महाराजांनी दर्ग्याचा पाया व भिंती काळ्या दगडाने बांधून घेतल्या दर्ग्याच्या सभोवतालचे बांधकाम खास संकेतानुसार महाराजांनी सूर्यास्तानंतर सुरू केले पण थोड्याच कालावधीनंतर त्यांना मृत्यूने कवटाळले. पुढे संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याचे प्रयत्न केले व तेही काम अपुरे राहिले. नंतर थोरल्या बाजीरावाने दर्ग्यावर घुमट चढवण्याचा विचार केला. पण त्यांना स्वप्नात बाबांच्या आदेश आल्यामुळे त्यांनी तो नाद सोडला. पुढे ग्रामस्थांनी हे काम साधेपणे पूर्ण केले
टाइम्स स्पेशल
हजरत पीर याकूब सर्वरी बाबांचा वार्षिक 345 वा उर्स सोहळा बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये संध्याकाळी सात वाजता नियाज स्नेहभोजन, रात्री दहा वाजता सत्कार समारंभ व आभार प्रदर्शन, रात्री अकरा वाजता गुजरात येथील सादिल आली साबरी यांचा कवालीचा कार्यक्रम मध्यरात्री तीन वाजता संदल मिरवणूक असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दिवसभर दर्गा परिसरात पर्यटन विकास योजने अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार श्री. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम, माजी मंत्री रामदासभाई कदम, दापोली तहसीलदार सौ. अर्चना बोंबे, मौलाना आझाद विकास महामंडळाचे सदस्य व दर्गा ट्रस्टचे सल्लागार मुजीब रुमाणे, वफ बोर्डाचे डॉ. मुदस्सर तांबे उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त सर्व हिंदू - मुस्लिम बांधवांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मकबूल दिनवारे व सचिव श्री. जहूर झोंबडकर यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.