वरवेली (गणेश किर्वे) : गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी शृंगारतळी व लगतच्या जानवळे गावातील नदीकिनारील पाणवठ्यांचे स्त्रोत दूषित झाले आहेत. जल स्त्रोत दूषित झाल्याने येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सर्व रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात पाण्याचे जार दिले आहेत. प्रमोद गांधी यांनी छोट्या ओढ्यामध्ये सोडण्यात येणार्या सांडपाणी तसेच पाणवठ्याचे जलस्त्रोत याची पाहणी केली. ओढ्याकिनारी असलेल्या सर्व रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. ओढ्याच्या लगत असलेल्या बोअरवेल, विहिरीतील पाणी दूषित झाले असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. सदर पाण्याला उग्र वास येत असून या पाण्याला फेस व तवंग आलेला दिसून येत आहे. या नाल्याला निवासी गाळे, वसाहती, टपर्या यांचे गटारात पाणी सोडल्याने याचा परिणाम आजुबाजूच्या विहिरी, बोअरवेल यांच्या जलस्त्रोतांवर झाल्याने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसापूर्वी दूषित झालेल्या जलस्त्रोतांची पाहणी गुहागर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केली. त्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने तपासणी करुन कार्यवाहीला सुरुवात केली. यातील काही ना नोटीस सुद्धा देण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. श्रृंगारतळी वेळंब फाट्याजवळ एक मोठा नाला असून तो जानवळे गावच्या दिशेने जातो. महामार्ग रुंदीकरणात श्रृंगारतळी बाजारपेठेतून रस्त्याच्या दोनही बाजूने कॉंक्रीट गटारे बांधण्यात आली. ही गटारे या नाल्याला सोडण्यात आली आहेत. ही गटारे बाजारपेठेतील वसाहती, हॉटेल, लहान-मोठे दुकानदार, टपरीधारक यांना लागूनच गेल्याने दिवसभराचा जो काही कचरा असतो तो या गटारात टाकण्यात येतो. या गटारामध्ये दुकाने तसेच गटारा शेजारी राहत्या वस्तीतील मलमुत्र देखील सोडले जात असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. जलस्त्रोत दूषितमुळे श्रृंगारतळीसह जानवळे गावात आरोग्याचे बारा वाजले आहेत. यापूर्वी अनेकांना काविळसारख्या आजारांना सामोरे जावे लागले असल्याच्या तक्रारी सुद्धा येथील रहिवाशांनी प्रमोद गांधी यांच्याकडे मांडल्या. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीकडे याविषयी अनेक तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या होत्या. यावर ग्रा.पं. प्रशासनाने ठोस कार्यवाही अद्याप केली नाही. अद्यापही या पाण्यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही.
श्रृंगारतळीतील हॉटेल व्यवसायिक हॉटेलमधील सांडपाणी गटारात सोडत असल्याच्या तक्रारी सुद्धा पुढे येत आहेत. एकूणच या नाल्याला सर्वच बाजूने सांडपाणी वाहून येत असल्याने व तो नाला जानवळे गावापर्यंत पोहचलेला असल्याने आजुबाजूचे विहीर, बोअरवेल यांचे पाणी दूषित झाले आहे. बरेच वर्षे हा प्रकार सुरु आहे. मात्र, याकडे कुणीही गांभीर्याने पाहिलेले नाही. येथील रहिवासी यांच्या विहिरीच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असून ते वापरायोग्य व पिण्यायोग्य नाही. याचा त्रास या राहत्या घरातील कुटुंबियांना होत आहे. ओझरवाडी येथील मोठ्या खड्ड्यामध्ये येथील सर्व सांडपाणी जमा होत आहे, त्यामुळे या बाजूच्या परिसरातील विहिरी तसेच बोअरवेल यांनाही दूषित पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. यावेळी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, उपतालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सुजित गांधी, येथील रहिवाशांमध्ये पिंट्या जावकर, विनायक बारटक्के, किशोर गुहागरकर, सदानंद नर्बेकर, सायली भोसले, मयूर भोसले, जयश्री भोसले, चित्रा गुहागरकर, दीप्ती जावकर आदी उपस्थित होते. न्याय मिळायच्या उद्देशाने बुधवारी हे सर्व रहिवाशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गुहागरचे तहसीलदार यांची भेट घेणार आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.