शिरोडा- मालवणी ही केवळ एक मराठीची बोली नसून ती लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती, निसर्ग, पर्यावरण, आतिथ्यशीलता, प्राचीन परंपरा आणि चिकित्सकपणा यांचा संगम असलेल्या प्रदेशनिष्ठ संस्कृतीची वाहक आहे, असे प्रतिपादन येथे भरलेल्या मालवणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी येथे केले. आजगाव येथील ’साहित्य प्रेरणा कट्टा’ या संस्थेने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात आयोजित केलेल्या मालवणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे निमंत्रक तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री, ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, कार्यवाह सचिन गावडे, कवी रुजारीओ पिंटो आणि मालवणी भाषाप्रेमी तथा व्यापारी नितीन वाळके आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व गार्हाण्याने संमेलनाची सुरुवात झाली. स्थानिक कलावंत रवी पणशीकर याने दणक्यात गार्हाणे घातले. श्री. लळीत आपल्या भाषणात म्हणाले, मी मालवणी लेखक नसतानाही मालवणी बोलीच्या प्रसार व विकासासाठी केलेले काम लक्षात घेऊन आयोजकांनी माझी निवड अध्यक्षपदासाठी केली. लेखक नसलेल्या एका कार्यकर्त्याला हा मान देऊन त्यांनी मालवणीसाठी झटणार्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे. आधुनिकीकरणाच्या धबडग्यात सगळ्याच प्रादेशिक भाषा आणि विशेषतः बोलीभाषा यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. परंतु केवळ ’बोली कशा टिकणार?’ ही चिंता व्यक्त करून काही साध्य होणार नाही. त्यासाठी अशी छोटी छोटी बोली साहित्याची संमेलने होणे आवश्यक आहे. अशा प्रामाणिक हेतूने भरवलेल्या संमेलनामुळेच बोलीभाषा टिकून राहण्यास खरी मदत होणार आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून होणारे मंथन मालवणीच्या विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल.’ आजगाव साहित्य कट्ट्याचा त्रेपन्नाव्या कार्यक्रमाचे औचित्य साधून खटखटे ग्रंथालयाच्या मच्छिंद्र कांबळी सभागृहात हे संमेलन आयोजित केले होते. कवी सौदागर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नितीन वाळके यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सतीश लळीत यांचे अध्यक्षीय भाषण झाले.
अल्पोपाहाराच्या मध्यंतरानंतर कवी संमेलनाला सुरुवात झाली. दीपक पटेकर, रुजारीओ पिंटो, नितीन वाळके, विनय सौदागर, रामचंद्र शिरोडकर ,उर्जित परब, सोमा गावडे ,स्नेहा नारींगणेकर ,भालचंद्र दिक्षित ,रामदास पारकर या कवींनी आपल्या कविता सुरेख पद्धतीने सादर केल्या. सर्वच कविता आवडल्याचे सांगत कविसंमेलनाच्या अध्यक्षा डॉ. सई लळीत यानी कवितेचा मूळ प्रवास उलगडून दाखवला. शेवटी शबय ही अप्रतिम कविता त्यानी सादर केली. या संमेलनाला भेरा या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता यांनी आवर्जून भेट दिली. ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्रीराम दीक्षित यानी ग्रंथालयात चालणार्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ काजू, आंबे, करवंदे, फणस, पेरू, अबोली, सोनचाफा, मोगरा आदी फळा फुलांची आरास केली होती. सर्व मान्यवरांचा पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांचे हस्ते लळीत यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या खुसखुशीत शैलीत सचिन दळवीं यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून संमेलनात रंग भरले. या कार्यक्रमास श्याम नाडकर्णी, प्रदीप पेडणेकर, गुरुनाथ परब, लक्ष्मीकांत कर्पे, पत्रकार अनिल निखार्गे, डॉ.बापू भोगटे, वैद्य मुरलीधर देसाई, ज्ञानेश्वर मांजरेकर ,चंद्रसेन वेंगुर्लेकर गुरुनाथ जोशी, अर्जुन मुळीक, एडवीन डिसोझा आदी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.