रत्नागिरी - रत्नागिरीतील सुप्रसिध्द श्रीराम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात आज रवि. दि. ६ एप्रिल रोजी दुपारी संपन्न होणार असून राम जन्माच्या या आनंद सोहळ्याला सर्व भाविकांनी व बंधू भगिनींनी आवर्जुन उपस्थित रहावे आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील श्रीराम मंदिर हे एक पुरातन व जाज्ज्वल्य देवस्थान म्हणून सुपरिचित आहे. शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार यावर्षीही श्रीराम मंदिरात गुढीपाडव्या पासून राम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला. रवि. दि. ६ एप्रिल रोजी प्रत्यक्ष राम जन्मोत्सव सोहळा संपन्न होईल. पहाटे ६ वाजता नगारा व चौघडा वादन झाले. त्यानंतर स. ६ वा. देवतांना भरजरी वस्त्रे परिधान करण्यात आली. हा मान देवस्थानचे कार्याध्यक्ष ऍड. मिलिंद पिलणकर कुटुंबियांचा आहे. त्यानंतर ठिक ७ वा. देवतांची षोडषोपचारपूर्वक पूजा व अभिषेक संपन्न झाला. तसेच यावेळी प्रभू श्रीरामचंद्राला छपन्न भोग मिठाईचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर स. ८ ते ११ या वेळेत नामवंत भजन मंडळे आपली सेवा राम दरबारात रुजू करतील. स. ठिक ११ वा. ह.भ.प. श्री. भालचंद्र हळबे यांच्या प्रत्यक्ष श्रीराम जन्माच्या किर्तनाला प्रारंभ होईल.
प्रभू रामचंद्राचा जन्म ठिक १२.३९ वाजता होईल. रामजन्म होताच वाद्यांचा दणदणाट व रामाचा जयघोष होईल.. नगारा, चौघडा, ढोल ताशे दणाणू लागतील.. फटाक्यांची आतषबाजी होईल. यावेळी परिसरातील सर्व भाविकांना देवस्थानतर्फे फुले देण्यात येतील व भाविक रामावर पुष्पवृष्टी करतील. त्याचवेळी राम जन्माचा पारंपारिक प्रसाद ‘सुंठवडा’ व ‘बुंदी लाडू’ सर्व उपस्थित भाविकांना देण्यात येतील. सुंठवडा प्रसाद नामवंत उद्योजक श्री. प्रसन्नशेठ आंबूलकर यांच्यातर्फे देण्यात येणार असून भाविकांना देण्यासाठी बुंदी लाडू सुप्रसिध्द उद्योजक श्री. सुरेश गुंदेचा यांच्यातर्फे देण्यात येतील. सर्व उपस्थित भाविकांना रामजन्माचा सुंठवडा प्रसाद व बुंदी वाटपाचा मान हा गवळीवाडा मित्रमंडळाचा असून श्री. कोतवडेकर, श्री. पावसकर व त्यांचे सहकारी प्रसाद वाटप करतील. दरम्यान मंदिरामध्ये भगिनींची एकच लगबग सुरु झालेली असेल. बाळ रामाला भगिनी न्हावू माखू घालतील, भरजरी वस्त्रे परिधान करतील, काजळ व तीट लावतील आणि मग सर्व भगिनी बाळ रामाला पाळण्यात ठेवतील. यावेळी पाळणा गीते म्हणून बाळ रामाला जोजावण्यात येईल. बाळ रामाला न्हावू माखू घालण्याची संधी सर्वप्रथम नवविवाहित भगिनींना देण्यात येते. बुजूर्ग भगिनी त्यांना मार्गदर्शन करतात. बाळ रामाला पाळण्यात घालण्याचा सोहळा देवस्थानच्या अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल. प्रभू श्रीरामचंद्राचे नाव बाळ रामाच्या कानात देवस्थानच्या अध्यक्षा सांगतील आणि मग ते सर्वांसाठी जाहीर करतील. त्यानंतर देवस्थानचे मानकरी श्री. दिपक राऊत हे बाळ रामाला हाती घेऊन मंदिर व परिसरातील सर्व भाविकांना बाळ रामाचे दर्शन घडवतील. भाविक श्रध्देने बाळ रामाला वंदन करतील. हे सर्व सुरु असताना वाद्यांसोबतच ‘सियावर रामचंद्र की जय’ असा जयघोष होवून रामजन्माचा आनंद सोहळा सारे भाविक मनोभावे साजरा करतील.
सायं. ठिक ४ वा. प्रभू श्रीरामचंद्राची सवारी मोठ्या जल्लोषात निघेल. विविध वाद्यांच्या गजरात व तरुण तरुणींच्या जल्लोषात ही शोभायात्रा रत्नागिरीच्या बाजारपेठेतून प्रदक्षिणा करुन पुन्हा मंदिरात परत येईल. दरम्यान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात सुरु असतील. सायं. राम मंदिराजवळ फटाक्यांची रोषणाई होईल व रामजन्माचा हा आनंद सोहळा उत्साहात संपन्न होईल. यावेळी तरुण, तरुणी तसेच बंधू भगिनी या आनंद सोहळ्यात सहभागी होत असतात. या रामजन्मोत्सव सोहळ्याला सर्व बंधु भगिनींनी व भाविकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यावे, राम दरबारात स्वहस्ते पूजा करावी तसेच महाप्रसाद व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा आणि शोभायात्रेत सहभागी होवून प्रभू श्रीरामाचा जयजयकार करावा असे आवाहन श्रीराम मंदिर देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.