loader
Breaking News
Breaking News
Foto

पणदेरी, बहिरवली, कोंडगावांना सिंचनाचा लाभ, धरण दुरुस्तीसाठी ६१ कोटींचा निधी मंजूर

संगलट (खेड) (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे पणदेरी, बहिरवली, कोंडगाव आणि दंड नगरी आदी गावांना सिंचनाचा लाभ मिळणार असून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. राज्य सरकारने पणदेरी धरणाची दुरुस्ती व सुधारणा करण्यासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर केला असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पणदेरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे तसेच धरणाचा सांडवा फुटल्यामुळे धरण संपूर्ण क्षमतेने भरत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या धरणामुळे घोसाळे, पणदेरी, बहिरवली, कोंड गाव आणि दंड नगरी या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या दुरुस्तीमुळे स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. धरण फुटू नये यासाठी तो सांडवा फोडून धरण रिकामे करण्यात आले होते. त्यानंतर धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती करण्यात आली. गेली चार वर्षे धरण दुरुस्तीच्या प्रतिक्षेत होते याचा पाठपुरावा योगेश कदम घेत होते. धरणामध्ये गाळ साचल्यामुळे अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होत नव्हता. परिणामी, धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या स्थानिक शेतकर्‍यांना पाण्याच्या टंचाईचा मोठा फटका बसत होता. आता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने या भागातील भातशेती करणारे शेतकरी तसेच आंबा, सुपारी, काजू इत्यादी फळबागांचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना मोठा लाभ होणार आहे.

टाइम्स स्पेशल

पणदेरी धरणाचे काम सन १९९५-९६ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, सध्या या धरणाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने राज्यमंत्री कदम यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निधीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ३ एप्रिल रोजी ६० कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. धरणाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असून, प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रियेद्वारे कामाला सुरुवात होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg