loader
Breaking News
Breaking News
Foto

मूर्तीकार घनःश्याम भाटकर व मूर्तीकार पिलणकर दोघांनीही खडकातून "झरी विनायक" निर्माण केला व निर्गुण निराकारातून सगुण साकार रूप प्रकटले . - श्रीमती मीरा गिरीधर पिलणकर. (भाटये)

रत्नागिरी नजीक भाट्ये गावाजवळील समुद्रकिनाऱ्या लगतचे 'झरी' हे स्थान पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. तेथे डोंगराच्या कुशीतून अखंड वाहणारे पाण्याचे झरे अजूनही आहेत. पूर्वी त्याठिकाणी कपडे धुण्यासाठी गावातील अनेक स्त्रिया येत असत. त्यात भाट्ये गावातील प्रसिध्द मुर्तीकार कै.जनार्दन भिकाजी उर्फ भाऊ पिलणकर यांच्या मातोश्री कै. बयाबाई याही असत. इतर स्त्रियांहून बयाबाई वेगळी होती त्याकाळी तिचे संस्कृत सारख्या देवभाषेवर प्रभुत्व होते, मोठेमोठे धार्मिक ग्रंथ तिच्या केवळ संग्रही नव्हते तर त्यांचा तिने अभ्यास केलेला होता. अध्यात्मिक प्रवृत्ती असणा-या बयाबाईचे झ-याच्या वरच्या बाजूस असणा-या प्रचंड दगडाकडे नेहमी लक्ष्य जात असे तो पाषाण पाहून त्यांच्या मनात एक सगुणसाकार रूप निर्माण होत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बयाबाई चे ज्येष्ठ पुत्र बाबुलजी पिलणकर हे जन्मजात उत्कृष्ठ मूर्तीकार होते. त्यांच्या हस्तकौशल्यातुन उत्तमोत्तम प्रकारच्या गणपतीच्या मूर्ती घडविल्या गेल्या होत्या. सुप्रसिद्ध मूर्तीकार कै.घनःश्याम भाटकर आणि बाबुलजी पिलणकर यांचे धाकटे भाऊ पिलणकर हे दोघेही बाबुलजी पिलणकरांच्या मार्गदर्शनाखाली कलेचे धडे गिरवत होते. परंतु दुर्देवाने बाबुलजी पिलणकर अल्पायुषी ठरले. त्यांच्या पश्चात भाऊ पिलणकर व घनःश्याम भाटकर यांनी भाट्ये येथे गणपतीचा कारखाना एकत्र चालु ठेवला होता. घनःश्याम भाटकरही आपला जास्तीत जास्त जीवनकाल पिलणकर कुटुंबियांच्यात घालवित होते. त्यामुळे त्यांच्यावरही बयाबाईचे पुत्रवत प्रेम होते. आपल्या मनातील त्या प्रचंड दगडातून साकार होवू घातलेल्या गणपतीच्या मूर्तीची संकल्पना तिने या दोघांजवळ व्यक्त केली. आईचा शब्द झेलावयास सदा तत्पर असलेल्या या दोघांनी ती कल्पना उचलून धरली. मूर्ती कशा प्रकारची असावी हे ही त्यांनी ठरविले. दोघांचेही गुरु असलेल्या बाबुलजी पिलणकर यांच्या हस्तकौशल्यातून गणपतीची फ्रेम तयार होती. ती मूर्ती त्या दगडात खोदून गणपतीची नवीन प्रतिकृती निर्माण करावयाची ठरविले. ही गणपतीची फ्रेम म्हणजेच झरीविनायकाची मूळ प्रतिकृती, फ्रेममधील गणेशाचे श्रीमुख उजवीकडे आहे हे मात्र त्यांनी पूर्णतः समोर ठेवून पूर्ण मूर्ती तशीच कोरावयाची ठरविले.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

गावातील लोकांना जेव्हा त्यांच्या या शुभसंकल्पने विषयी कळले त्यावेळी अनेकजण त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार झाले. त्यावेळी त्यांच्याजवळ कोरीव कामासाठी लागणाऱ्या उत्कृष्ठ प्रकारच्या छिन्न्याही नव्हत्या. परंतु भाट्याचे माजी सरपंच कै. रामचंद्र शिवराम भाटकर यांच्या मातोश्री कै. भागिरथी शिवराम भाटकर यांनी व इतर अनेक वयोवृध्द भावी स्त्रियांनी त्यांना उत्कृष्ट प्रकारच्या छिन्न्या दिल्याच परंतु खडकावर काम करून बोथट झालेल्या छिन्न्यांना धार काढुन देण्याचे कामही त्यांनी आपलेपणाने केले. जवळजवळ तीन वर्षे अथक परिश्रमाने आणि सातत्याने मूर्तीकार घनःश्याम भाटकर व मूर्तीकार पिलणकर त्या ओबडधोबड खडकातून गणेशमूर्ती खोदत होते. काम चालू असताना अनेक नैसर्गिक, व्यावहारीक अडचणी आल्या. त्यांना तोंड देत दोघांनीही त्या खडकातून "झरी विनायक" निर्माण केला व निर्गुण निराकारातून सगुण साकार रूप प्रकटले अशी ही झरीविनायकाची जन्मकथा आहे. - सौजन्य श्रीमती मीरा गिरीधर पिलणकर. (भाटये)

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg