चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव गावातील पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत आदिमाया आदिशक्ती श्री भवानी देवी आहे. श्री कालकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. रामवरदायिनी मंदिर मजरे दादर येथे दसपटकर शिंदे कदम मोकाशी यांची एकच जत्रा होत असे. परंतु अंदाजे एका शतकापासून रामवरदायिनी मंदिर दादर आणि श्री कुलस्वामी भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव अशा दोन वेगवेगळ्या जत्रांचे आयोजन चैत्रपौर्णिमेस केले जाते. या जत्रेविषयी एक दंतकथा आहे, एक वेळ कदम मोकाशी टेरकर यांच्या काही मनाबद्दल थोडी चूक झाली होती. त्यामुळे त्याच रात्री श्री रामवरदायिनी मंदिर दादर येथून निघून टेरवकरांनी आपल्या टेरव गावी जत्रा भरविली. एकमेकांची समजूत घालण्यात आली व पूर्वीप्रमाणे एकोप्याने वागू लागले, परंतु देवीचे कार्य सुरू केल्यामुळे ते चालू ठेवावे लागले, यावरून दसपटकरांचे एकमेकांवरचे प्रेम व सौख्य दिसून येते.
शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या संकटमोचक महाबली श्री हनुमान जन्मोत्सव शनिवार दिनांक १२ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सुर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकऱ्यानी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून गाऱ्हाणे (आर्जव) घालून पुजाऱ्यानी ते श्रीफळ वाढवून प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप केले. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे-मागणे देवून उपस्थित ग्रामस्थ, भाविकांना पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या - मागण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. रुढी परंपरेनुसार सर्व पुजाविधी पार पडल्यावर पालखीमध्ये कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांची रुपे लावण्यात आली.शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा श्री क्षेत्र टेरव गावचा चैत्रपोर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस होय. माहेरवाशिणी, सगे सोयरे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकानी या जत्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेतला. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अन्य ग्रामस्थांप्रमाणे मुंबई, ठाणे, पुणे, सुरत इ. शहरात स्थायिक झालेले टेरकर आपल्या मायभूमीला विसरलेले नाहीत, ही गावासाठी जमेची बाजू होय.
टाइम्स स्पेशल
चैत्र पौर्णिमा जत्रेस मोठ्या प्रमाणावर धार्मिक स्वरुप यावे आणि जत्रेची शोभा वाढावी यासाठी पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्या वाजतगाजत मिरवणुकीने टेरव येथे रात्रौ १० वाजता पोहचल्या होत्या. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविण्यात आल्या होत्या. रूढी परंपरे प्रमाणे चिंचघरीची पालखी श्री शिवराम गुरव यांच्या अंगणात तर कामथे गावची पालखी श्री संतोष म्हालीम यांच्याअंगणात थांबली होती. कामथेच्या पालखीचे स्वागत टेरवच्या पालखीने भारतीवाडीच्या होळीवर करून तेथून या दोन्ही पालख्या श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळ चिंचघरीच्या पालखीस भेटल्या. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक श्री शिवराम गुरव यांच्या घराजवळून मंदिराकडे मार्गस्थ झाली. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटवितानाचे दृश्य विलोभनीय, मनमोहक व नयनरम्य होते, ते पाहून असंख्य भाविक आनंदाने बेभान झाले व तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. या तीन पालख्यांची भेट पाहून मन अगदी भरुन आले होते. पालख्यांची भेट झाल्यावर प्रथम कामथे नंतर चिंचघरी व शेवटी टेरवची पालखी छबेना काढून मंदिरात स्थानापन्न झाली. मंदिरात ओटी भरण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. कोकणातील प्रति तुळजापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेरवच्या श्री भवानी वाघजाई देवीच्या दर्शनासाठी तसेच वस्त्रालंकारांनी सजलेले देवीचे रूप पाहण्यासाठी भाविकांचा महापूर श्री क्षेत्र टेरव येथे लोटला होता. या वार्षिक जत्रोत्सवास चैत्रावली असेही संबोधले जाते. ग्रामदेवतांच्या पालख्या, करमणुकीची साधने, खाद्य व प्रसादाची दुकाने, आणि विविध खेळांचे प्रदर्शन ही या जत्रेची विशेषता होय. तिन्ही पालख्या मंदिरात स्थानापन्न झाल्यावर रात्रौ कोल्हापुर येथील एका पेक्षा एक अप्सरा ह्या मराठी लोकधरेने सजलेल्या आणि महाराष्ट्राच्या लावणीने बहरलेला मराठी व हिंदी गीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.