सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावाचे सुपुत्र आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वासुदेव उर्फ भाई देऊलकर यांनी आपल्या ७६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत देहदानाचा धाडसी निर्णय घेतला आहे. सिंधू रक्तमित्र संघटनेचा देहदानाचा फॉर्म भरून त्यांनी आपला हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, संजू परब यांच्यासह मित्रपरिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी भाई देऊलकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी देहदान आणि नेत्रदानाचा संकल्प केला. रिक्षा संघटनेचे नेते सुधीर पराडकर यांनी नेत्रदानाचा, सैनिक स्कूलमधील परमेश्वर सावळे आणि सर्पमित्र महेश राऊळ यांनी देहदानाचा निर्णय घेतला. तर संजय पिळणकर, त्यांच्या पत्नी सौ. समृद्धी पिळणकर आणि सासूबाई श्रीमती सरिता मुननकर यांनी नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, सिंधू रक्तमित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, तालुका अध्यक्ष सुनील राऊळ, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, शामसुंदर देऊलकर, दीनानाथ बांदेकर, रिक्षा संघटनेचे नेते सुधीर पराडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाई देऊलकर म्हणाले, "माझ्या वडिलांची इच्छा होती की मी देहदान करावे. आज ७६ व्या वाढदिवसानिमित्त मी परंपरेला बाजूला ठेवून देहदानाचा निर्णय घेतला आहे. जीवनात अनेक कामे केली, पण देहदानाचा निर्णय घेताना मला विशेष समाधान वाटत आहे." सिंधू रक्तमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले की, भाई देऊलकर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून देहदानाच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी अर्ज भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आज अनेक मान्यवरांनी देहदान व नेत्रदानाचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. देहदान वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असेही ते म्हणाले. सैनिक पतसंस्थेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ यांनी भाई देऊलकर यांच्या निर्णयाचे कौतुक करताना सांगितले की, भाई देऊलकर देहदानाच्या विचारापर्यंत आले. त्यांनी परंपरेला छेद दिला आहे. त्यांचा हा निर्णय समाजाला संदेश देणारा आणि उच्च कोटीचा विचार आहे. देहदानामुळे देह पुण्यवंत ठरेल असेही ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाई देऊलकर यांच्याबद्दल बोलताना म्हटले की, समाजात इज्जत असणारी माणसे थोडीच असतात आणि भाई देऊलकर त्यापैकी एक आहेत. त्यांचा देहदानाचा निर्णय मोक्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. रिक्षा संघटनेचे नेते सुधीर पराडकर यांनी आपण नेत्रदानाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आणि भाई देऊलकर यांनी चांगला निर्णय घेतल्याचे म्हटले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी भाई देऊलकर यांना भगवद्गीता भेट दिली. भाई देऊलकर यांचे सुपुत्र, शामसुंदर देऊलकर यांनी सांगितले की, देहदानाचा निर्णय घेताना जुन्या रुढी-परंपरांना सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी जवळच्या लोकांना हा निर्णय पटवून दिला. यामुळे देहदानाचा फायदा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी होईल. सिंधू रक्तमित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी देहदानाचे महत्त्व कथन केले. समाजात रुढी-परंपरेला बाजूला ठेवून दातृत्वाचे एक नवीन रूप निर्माण होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार पत्रकार शाम देऊलकर यांनी मानले. देहदान आणि नेत्रदान हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आणि समाजासाठी उपयुक्त असे निर्णय आहेत. या निर्णयामुळे अनेक गरजू लोकांना जीवनदान मिळू शकते किंवा त्यांचे जीवन सुकर होऊ शकते, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.