तिलारी (प्रतिनिधी) - एकीकडे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी स्वतः शासनानेच कोट्यवधी रुपये खर्चून 'राखीव संवर्धन' क्षेत्र घोषित करायचे आणि दुसरीकडे त्याच जंगलातील हत्तींना मात्र परक्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा घाट घालायचा, असा विचित्र आणि विरोधाभासी प्रकार सध्या वनविभागाकडून सुरू आहे. सावंतवाडी-बांदा परिसरात वावरणाऱ्या 'ओंकार' हत्तीला जामनगरच्या 'वनतारा' प्रकल्पात पाठवण्याच्या हालचाली सुरू असतानाच, स्थानिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी "जर हत्तींसाठीच हे जंगल राखीव केले आहे, तर मग त्यांना दुसरीकडे का पाठवता?" असा तिखट सवाल उपस्थित केला आहे.
शासनाने दिनांक २२/०६/२०२० रोजी एका विशेष अधिसूचनेद्वारे सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग तालुक्यातील तब्बल २९५३.३७७ हे . आर क्षेत्र 'संवर्धन राखीव' म्हणून घोषित केले आहे. यामध्ये मौजे कोनाळ, बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे बुद्रुक व खुर्द, पाटये, शिरंगे, आयनोडे, हेवाळे व मेढे या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या भागातील वाघ, बिबटे आणि प्रामुख्याने हत्ती व त्यांच्या अधिवासाचे रक्षण करणे, हेच या घोषणेमागचे मुख्य प्रयोजन असल्याचे शासनाने स्पष्ट केले होते. स्थानिकांचे म्हणणे आहे की, जर शासनाने हे क्षेत्र हत्तींसाठीच संरक्षित केले आहे, तर मग सध्या या भागात असलेल्या 'ओंकार' हत्तीला वनतारा प्रकल्पात पाठवण्याचा अट्टाहास का केला जात आहे? हक्काचे संरक्षित घर असताना त्याला अन्यत्र हलवणे हे शासनाच्याच २२ जून २०२० च्या अधिसूचनेचा विरोधाभास करणारे नाही का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
केवळ हत्तींचा प्रश्न नाही, तर या निर्णयांमुळे सामान्य नागरिकही वेठीस धरले गेले आहेत. दोडामार्ग तालुक्यातील केवळ ६ गावे 'इको सेन्सिटिव्ह' झोनमध्ये येतात. मात्र, प्रशासनाने सरसकट संपूर्ण तालुक्यात वृक्षतोड बंदी लागू केली आहे. ही अन्यायकारक असून, ज्या गावांचा यात समावेश नाही, तेथील निर्बंध तातडीने उठवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. घराच्या दुरुस्तीसाठी किंवा इतर महत्त्वाच्या वैयक्तिक कामासाठी शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीच्या जागेतील लाकूड तोडले, तरी वन विभाग त्यावर हरकत घेऊन काम थांबवते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक मनस्ताप आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र, दुसरीकडे केरळीयन व्यावसायिक आणि काही धनदांडग्यांकडून होणाऱ्या हालचालींकडे व वृक्षतोडीकडे मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामीण भागातील महिला आजही सरपण आणि जळणासाठी जंगलातील वाळलेली लाकडे गोळा करतात. मात्र, वनविभागाकडून त्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. केवळ सुकी लाकडे गोळा करणाऱ्या महिलांना गुन्हेगारासारखी वागणूक देणे थांबवावे, अशी मागणी होत आहे. हत्तीला त्याचे हक्काचे घर नाकारणे आणि भूमिपुत्रांना त्यांच्याच हक्काच्या साधनांपासून वंचित ठेवणे, हे शासनाचे धोरण दुर्दैवी आहे. त्यामुळे शासनाने आपल्याच 'संवर्धन राखीव' निर्णयाचा मान राखत ओंकार हत्तीला इथेच अभय द्यावे. तसेच, सरसकट वृक्षतोड बंदी उठवून सामान्य जनतेला वनविभागाच्या जाचक अटींतून मुक्त करावे, अशी आर्त हाक आता दोडामार्गच्या खोऱ्यातून येत आहे.

























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.