loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री क्षेत्र टेरव येथे ३ मार्चपासून शिमगोत्सवाचा जल्लोष

चिपळूण - निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या कुलस्वामिनी श्री भवानी - वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात व धार्मिक वातावरणात दिनांक ३ मार्चपासून साजरा होणार आहे. देवस्थानचे मानकरी, पुजारी व ग्रामस्थ हे उत्सवाची जय्यत तयारी करत आहेत. कुलस्वामिनी श्री भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजारी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकर्‍यांच्या हस्ते पहाटे यथासांग विधीवत पुजा करुन घेतील. गावचे पुजारी (गुरव) चांदीने मढविलेली पालखी सजवून कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी या देवतांच्या रुपी लावून मंदिर व होमा समोरील मानाच्या सहाणेवर आसनस्थ करतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे वेध लागण्यापूर्वी ढोलताशांचा गजरात होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम पहाटे ५.३० वाजता प्रज्वलीत करुन ग्रामस्थ होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण करतील. प्रदक्षिणा घालताना ’भैरी- केदाराच्या चांगभलं’ असे म्हणत पालखी नाचवत उंचावून उपस्थित भाविकांना दर्शन दिले जाईल, तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा असेल. नववधू, सुवासिनी सहाणेवर पालखीत देवीच्या ओट्या भरतील. ग्रहण असल्यामुळे पालखी मंदिरात सकाळी ६.२० वाजता स्थानापन्न करून मंदिर दर्शनासाठी संध्याकाळी ६.४५ पर्यंत बंद ठेवण्यात येईल.

टाईम्स स्पेशल

ग्रहण काळ संपल्यावर मंदिराची साफसफाई, शुद्धीकरण व देवतांचे अभिषेक करून रात्री ८ नंतर परंपरेप्रमाणे पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात येईल. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा ’छबिना’ काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत मध्यरात्री मंदिरात आणली जाईल. ४ ते १४ मार्च या कालावधीत पालखी रूढीपरंपरेनुसार घरोघरी नेण्यात येईल यास ’भोवनी’ असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास बहुसंख्य चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित राहतील. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ होईल. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहार्‍यासाठी (सेवेसाठी) उपस्थित राहतील. सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहील. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल वाजविले जातील. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधव पालखीसोबत ताशा वाजावतील, अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या शिमगोत्सवाची सांगता रुपी भंडारुन करण्यात येईल. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg