loader
Breaking News
Breaking News
Foto

वार आणि पलटवार! इराण अमेरिकेला नडणार, युद्धाचा भडका

इराणचे नेतृत्व मजबूत लष्करी क्षमतांनी आणि प्रादेशिक ‘प्रॉक्सी’ दलांच्या जाळ्याने सुसज्ज आहे. हे गट या संघर्षात उतरले तर युद्ध केवळ विस्तारेलच नाही तर अधिक काळ टिकण्याची शक्यता आहे. एका अहवालात तज्ज्ञांनी अमेरिकेला इराणविरुद्ध कारवाईबाबत इशारा दिला होता. इंटरनॅशनल क्रायसीस गृपचे अली वाएझ यांनी म्हटले आहे की, इराणविरुद्धची लढाई लहान किंवा सोपी ठरणार नाही. इराणला सहज नियंत्रणात आणता येईल, असे मानणे चुकीचे ठरेल. त्यांच्या मते या संघर्षामुळे जागतिक पातळीवरील धोके वाढतील आणि अमेरिकन नागरिकांच्याही सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. मात्र मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना राजकीय फायदा देऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते. जानेवारीत अमेरिकेच्या कारवाईपूर्वी व्हेनेझुएलाचे हवाई संरक्षण तुलनेने कमकुवत होते. मात्र तज्ज्ञांच्या मते इराणकडे मध्यपूर्वेतील सर्वात मोठ्या आणि विविध प्रकारच्या क्षेपणास्त्र साठ्यांपैकी एक साठा आहे. त्यात ड्रोन आणि जहाजविरोधी शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे. जूनमध्ये इजरायलसोबत १२ दिवस चाललेल्या युद्धानंतर इराणच्या क्षेपणास्त्र साठ्याची नेमकी स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इराणची मध्यम पल्ल्‌याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे १,२०० मैलांहून अधिक अंतर गाठू शकतात. या पल्ल्‌यात पश्चिम तुर्कीतील अमेरिकन तळांसह इस्रायल आणि खाडी देशांतील अनेक भाग येतात. अलीकडेच इराणने हॉर्मुज जलडमरूमध्य येथे लष्करी सरावादरम्यान प्रथमच ९३ मैलांपेक्षा अधिक पल्ल्‌याच्या समुद्र-आधारित हवाई संरक्षण क्षेपणास्त्राची चाचणी केली. अहवालानुसार तज्ज्ञ सनम वकिल यांच्या मते, तेहरानची रणनीती अनेक आघाड्यांवर अस्थिरता वाढवण्याची असेल; ज्यामुळे युद्धाचा विस्तार होईल आणि अमेरिका व तिचे सहयोगी देश अधिक अडचणीत येतील. आखाती देशांमध्ये अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आहेत. त्यामुळे अमेरिकन हल्ल्‌याला प्रत्युत्तर म्हणून इराण त्यांच्यावरही कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. म्हणूनच अनेक देश युद्ध टाळण्याचा आग्रह धरत होते. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमीरात यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ते अमेरिकेला त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी देणार नाहीत. तरीही इराणच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, ही त्यांची भीती खरी ठरली आहे. इराणच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्‌यांमुळे इस्रायलमधील प्रमुख शहरे धोक्यात येऊ शकतात. जूनमध्ये सुरू झालेल्या संघर्षात इस्रायली सैन्याने इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या मदतीने इराणच्या बहुतेक क्षेपणास्त्रांना निष्प्रभ केले होते. मात्र गाझामधील हमास आणि लेबनानमधील हिज्बुल्लाहच्या हल्ल्‌यांमुळे गेली दोन वर्षे सातत्याने लढत असलेल्या इस्रायलच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्र साठ्यात घट झाल्याची शक्यता गुप्तचर अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. इराण मध्यपूर्वेत ’प्रतिरोध धुरी’च्या माध्यमातून प्रॉक्सी दलांचा वापर करतो. यात येमेनमधील हौथी बंडखोर आणि लेबनानमधील हिज्बुल्लाहचा समावेश आहे. या गटांना शस्त्रसज्ज करून इराणने प्रादेशिक प्रभाव वाढवला आहे. जरी काही प्रॉक्सी गट कमकुवत झाले असले तरी ते अमेरिकन सैन्य व त्यांच्या सहयोगींविरुद्ध हल्ले करू शकतात, ज्यामुळे संघर्ष इराणच्या सीमांपलीकडेही विस्तारू शकतो.

टाइम्स स्पेशल

इराकमधील किमान एका इराणसमर्थक गटाने अमेरिकेने हल्ला केल्यास तेहरानला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या नेत्यांनी व्यापक संघर्षाच्या परिस्थितीत शहादत मोहिम सुरू करण्याचा इशाराही दिला आहे. तज्ज्ञांच्या मते २०२३च्या अखेरीस हमासला पाठिंबा देताना जसे लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते, तसे हौथी बंडखोर पुन्हा कारवाया सुरू करू शकतात. इराणमध्ये धर्माधारित शासनव्यवस्था आहे, ज्यामध्ये सर्वोच्च नेता ही मुख्य सत्ता आहे. वास्तविक ताकद इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स या सुमारे १.५ लाख सदस्यांच्या शक्तिशाली लष्करी संघटनेकडे आहे. ही संघटना सत्ताधारी व्यवस्थेचे संरक्षण करते आणि तिच्या धोरणांना पुढे नेते. इराणमध्ये सत्तांतर करणे म्हणजे केवळ सर्वोच्च नेत्याला हटवणे नाही. सुमारे अर्धशतकापासून मजबूत झालेल्या विचारसरणीवर आधारित आणि राजकीय कट्टरपंथीयांच्या पाठिंब्याने उभ्या असलेल्या गुंतागुंतीच्या सत्तासंरचनेमुळे बदल करणे अत्यंत कठीण आहे. इराणने यापूर्वीही हॉर्मुज जलडमरूमध्य बंद करण्याची धमकी दिली आहे. हा मार्ग जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून जगातील सुमारे एक-पंचमांश तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायू याच मार्गाने वाहतूक केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg