loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील लोककला भक्तीभाव, लोकाश्रयामुळे जिवंत!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणचे निसर्गसौंदर्य जितके मन मोहून टाकणारे आहे, तितकीच येथील लोकसंस्कृती परंपरागत, समृद्ध आणि विशाल आहे. कोकणी माणूस पिढ्यान्‌पिढ्या आपल्या प्रथा, परंपरा आणि श्रद्धा जपत आला असून निसर्गाशी व देवदेवतांशी असलेले त्याचे नाते आजही तितकेच घट्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणाऱ्या युगात अनेक लोकसंस्कृतींवर परिणाम झाला असला, तरी कोकणातील लोकसंस्कृतीने मात्र आपले मूळ स्वरूप टिकवून ठेवले आहे. मनोरंजनाच्या आधुनिक साधनांची रेलचेल असतानाही कोकणातील लोककला आजही भक्तीभाव आणि लोकाश्रयामुळे जिवंत राहिल्या आहेत. गावातून शहराकडे गेलेला कोकणी तरुण आपली संस्कृती मागे सोडत नाही. उलट शहरातील जीवनशैलीतही तो आपल्या परंपरेला सामावून घेतो. शहरीकरण आणि तांत्रिकीकरणामुळे तरुण काही अंशी परंपरेपासून दूर जात असल्याचे दिसत असले, तरी त्याच्या मनावर असलेले सांस्कृतिक संस्कार पूर्णपणे पुसले गेलेले नाहीत. रोजगारानिमित्त शहरात स्थायिक झालेला तरुण सण-उत्सवांच्या निमित्ताने गावाकडे परततो, देवदेवतांच्या भक्तीत तल्लीन होतो आणि लोककलेच्या सादरीकरणात उत्स्फूर्त सहभाग घेतो. भक्ती आणि आनंद यांची सांगड घालत तो या लोककलांमध्ये मनोभावे सहभागी होत असल्याने कोकणातील लोककला आजही लोकप्रिय आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशात आणि जगात अनेक लोककला लोप पावत असताना कोकणात मात्र लोककला जपल्या गेल्या आहेत. गणेशोत्सव, शिमगोत्सव, यात्रोत्सव या काळात लोककलेचे सादरीकरण भक्तीभावाने आणि उत्साहात केले जाते. शेतातील कामातून मोकळा झालेला शेतकरी गणेशोत्सव व शिमगोत्सवाच्या काळात या लोककलेत रमतो. नमन खेळे, दशावतार, जाखडी यांसह गज्जोनृत्य, घुमटनृत्य अशा विविध लोकनृत्यांनी कोकणची संस्कृती समृद्ध झाली आहे. दशावतार व नमन खेळ्यांतील पारंपरिक वेशभूषा आणि देवदेवतांचे प्रवेश आजही त्यांच्या प्राचीनतेची साक्ष देतात. रत्नागिरी जिल्ह्यात नमन खेळे व जाखडी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार या लोककलांना मोठा लोकाश्रय लाभलेला आहे. विशेषतः नमन खेळे ही लोककला रत्नागिरी जिल्ह्यात अधिक लोकप्रिय आहे. या लोककलेच्या उगमाबाबत सांगितली जाणारी आख्यायिका कोकणातील कष्टकरी समाजाशी निगडित आहे. शेती, कालवे व विहिरी खोदण्याचे कष्टप्रद काम करणारा कुणबी समाज आपला शीण घालवण्यासाठी संतांची अभंगवाणी आणि स्वरचित गीते गात असे. हळूहळू त्यात वाद्ये, वेशभूषा आणि नृत्याची भर पडत गेली आणि नमन खेळ्यांची निर्मिती झाली.

टाइम्स स्पेशल

आज नमन खेळे प्रीतीचे खेळे आणि वस्तीचे खेळे अशा स्वरूपात सादर केली जातात. होळीच्या सणाच्या निमित्ताने गावातील कलावंत एकत्र येऊन विशिष्ट वेशभूषेत खेळ्यांचे सादरीकरण करतात. ग्रामदेवतेच्या पालखीमागून खेळे बाहेर पडतात आणि घरोघरी त्यांचे स्वागत केले जाते. रामायण व महाभारतातील प्रसंगांवर आधारित गीते, संकासूर, कोळीण यांसारखी सोंगे, नृत्य आणि विनोद यांची सांगड यात पाहायला मिळते. यजमानांकडून मानपान स्वीकारल्यानंतर खेळे त्या कुटुंबाला समृद्धीचा आशीर्वाद देतात. नमन खेळे हा लोकनाट्य प्रकार पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागांत विभागलेला आहे. पूर्वार्धात विविध देवदेवतांना नमन करून गणपतीपूजनाचा विधीनाट्यप्रसंग सादर केला जातो. उत्तरार्धात आख्यान-नाटक सादर केले जाते, ज्याची कथानके पुराणे, लोककथा किंवा ऐतिहासिक मिथकथांवर आधारित असतात. या कथांमधून सद्गुणांचा विजय आणि दुर्गुणांचा पराभव दाखवला जातो. भक्ती, रंजन आणि प्रबोधन असा दुहेरी हेतू साधणारी ही लोककला कोकणच्या परंपरागत संस्कृतीशी पूर्णतः एकरूप झालेली आहे. याच लोकाश्रयामुळे आणि श्रद्धेमुळे कोकणातील लोकसंस्कृती आणि लोककला आजही तितक्याच सशक्तपणे टिकून असल्याचे चित्र पाहायला मिळते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg