loader
Breaking News
Breaking News
Foto

"सत्ता युतीत असते, निवडणुका युतीत लढल्या जातात; पण संघटना मात्र नेहमी 'शतप्रतिशत'च वाढवायची असते - आमदार प्रमोद जठार

रत्नागिरी: "सत्ता युतीत असते, निवडणुका युतीत लढल्या जातात; पण संघटना मात्र नेहमी 'शतप्रतिशत'च वाढवायची असते," अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार आणि नवनियुक्त कोकण विभाग संयोजक प्रमोद जठार यांनी आपल्या आगामी वाटचालीचा निर्धार व्यक्त केला. खनिकर्म प्रकल्‍प हे पर्यटन जिल्‍ह्यात होऊ नयेत या मताचा मी असून, स्‍थानिकांचा बॉक्‍साईट प्रकल्‍पांना विरोध असेल तर आपण त्‍यांच्‍या सोबत ठामपणे राहणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. विधान परिषदेवर आमदार म्‍हणून निवडून आल्‍यानंतर ते प्रथमच रत्नागिरी दौऱ्यावर आले असता, भाजपा कार्यालयात त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दक्षिण रत्‍नागिरीचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रशांत यादव, तालुकाध्‍यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी, ॲड. बाबासाहेब परुळेकर यांच्‍यासह पदाधिकारी उपस्‍थित होते. रत्‍नागिरीत येताना त्‍यांचे राजापूरपासून चिपळूणपर्यंत कार्यकर्‍त्यांनी जागोजागी स्‍वागत केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकतानाच, कोकणच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आपली आक्रमक भूमिका मांडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पक्षाने आपल्‍यावर पालघर ते सिंधुदुर्ग अशा संपूर्ण कोकण पट्ट्यातील समन्वयाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीनंतर कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्‍यक्ष रविंद्र चव्‍हाण, कोकणचे नेते नारायण राणे यांचे आभार मानले. जठार म्हणाले की, जुने-नवे कार्यकर्ते, सरकार आणि जनता, तसेच महायुतीमधील घटक पक्ष यांच्यात सुवर्णमध्य साधून पक्ष संघटना तळागाळापर्यंत बळकट करणे ही माझी प्राथमिकता आहे. १९ तारखेला उत्तर रत्नागिरी आणि २० तारखेला रायगड मधील कार्यकर्‍त्यांना आपण भेटणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. "माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा शेवटच्या माणसापर्यंत सरकारी योजना पोहोचवणारा दूत असेलच, पण संकटाच्या वेळी त्याने स्वतःला 'गृहमंत्री' समजून काम करावे. अन्यायाविरुद्ध लढताना कार्यकर्त्याची एवढी ताकद असावी की, कोणत्याही गरिबावर प्रसंग ओढवण्यापूर्वी भाजपचा कार्यकर्ता तिथे पोहोचलेला असेल," असे आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्‍त्यांना केले. महिलांविषयी कोणतेही वाईट प्रकार घडू नयेत याची दक्षताही कार्यकर्‍त्यांनी घेतली पाहिजे असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

टाइम्स स्पेशल

"खाणकामाच्या माध्यमातून डोंगर उकरून मटेरियल घेऊन जाणे आणि मागे फक्त खड्डे ठेवणे, याला माझा विरोध आहे. जर स्थानिकांचा बॉक्साईटच्या खाणींना विरोध असेल, तर माझाही त्याला ठाम विरोध राहील. खरेतर पर्यटनदृष्‍ट्या विकसित होणार्‍या जिल्‍ह्यात खनिकर्म प्रकल्‍प होऊ नये असे आपले मत आहे. अशा प्रकारे खाणी करून खड्डे पाडून कुणालाही इथून जाऊ देणार नाही," असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला. खरेतर रिफायनरी आणि बॉक्साईट हे दोन वेगळे विषय आहेत. आंध्रप्रदेशने ही रिफायनरी त्‍यांच्‍या राज्‍यात नेली. त्‍याठिकाणी मोठ्या नोकर्‍यांच्‍या संधी तेथील जनतेला निर्माण झाली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जठार यांनी समन्वयाचा मंत्र देतानाच, पक्ष विस्तारासाठी 'शतप्रतिशत'चा नारा देत विरोधकांनाही इशारा दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे कोकणातील राजकीय हालचालींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg