loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली-क्षेत्रफळवाडी घनदाट जंगल परिसरात पट्टेरी वाघ निदर्शनास

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-क्षेत्रफळवाडी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई—गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या घनदाट जंगल पट्ट्यात पट्टेरी वाघ दिसल्याची घटना घडली असून, थरारक क्षण प्रवाशांच्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाल्याने तो क्षण आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. उंच खडकावर निवांत बसलेल्या या वाघाच्या दृश्याने स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्साह द्विगुणित केला आहे. या भागात वाघाचा वावर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये पूर्वीपासून होती. परंतु, प्रत्यक्ष दर्शनामुळे संशयाला आता पूर्णविराम मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जंगलसंपत्तीत नव्याने अधोरेखित झालेला हा ठसा जिल्ह्याच्या जैवविविधतेच्या मूल्याला नवे अधिष्ठान देणारा ठरतो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इन्सुली—माजगाव दरम्यानचा पट्टा घनदाट अरण्य, ओढे, झरे आणि औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक दुर्मिळ पक्षी आणि प्राणी आधीपासूनच वास्तव्य करतात. अशा वेळी वाघाचे प्रत्यक्ष अस्तित्व उघड झाल्याने या क्षेत्राला ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर करण्याच्या मागणीला मोठे बळ मिळाले आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांचे मत आहे की शासनाने संवेदनशील दृष्टीकोनातून या प्रस्तावाला गती द्यावी. वाघ दर्शनानंतर वनविभागाने सतर्कता वाढवली असून हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थ व प्रवाशांनी जंगलात अनावश्यक वावर टाळावा, तसेच वन्यजीवांच्या संरक्षणात सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

वाघ आमच्या डोळ्यांसमोर दिसला अशी बातमी गावागावात पोहोचताच नागरिकांनी उत्सुकतेने जंगलाकडे वळ घेतला. मात्र, पशुधन व शेतजमिनींच्या सुरक्षेची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वाघाचा अधिवास सुरक्षित ठेवताना स्थानिकांचे हित जपले जावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. सिंधुदुर्ग हा दुर्मिळ जैवसंपत्तीचा खजिना आहे. पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती आणि आता वाघ या सर्वांचा संगम म्हणजे या भागाची खरी ओळख. निसर्गप्रेमींचे मत आहे की शासन, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण तज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करणे हीच खरी जबाबदारी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg