loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली नाक्यावर धाडसी कारवाई, १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी)- सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाती घेतलेल्या धाडसी कारवाईत तब्बल १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, अवैध दारू वाहतुकीवर विभागाने मोठा आघात केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. विभागाचे पथक सहाय्यक आयुक्त धनंजय साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राप्त माहितीनुसार, मंगळवार, मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाक्यावर पथकाने गोपनीय माहितीनुसार सापळा रचला. गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या टाटा मोटर्स कंपनीच्या बाराचाकी कंटेनर (जीजे-१०-झेड-९९८४) ची तपासणी करण्यात आली असता, कंटेनरमध्ये गोवा बनावटीच्या रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की या विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. कंटेनरमध्ये १८० मि.ली. क्षमतेच्या प्रत्येकी ४८ सीलबंद बाटल्या असलेले १५०० पुठ्‌ठ्याचे खोके (एकूण ७२,००० बाटल्या) आढळून आल्या. या साठ्याची किंमत सुमारे ९३ लाख ६० हजार रुपये, तर वापरण्यात आलेल्या कंटेनरची किंमत १५ लाख रुपये, आणि जप्त केलेले दोन अँड्रॉइड मोबाईल २० हजार रुपये इतकी असून, एकूण १ कोटी ८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या वाहनासोबत असलेले रामनिवास (वय २५, रा. बाडमेर, राजस्थान) आणि नूर आलम (वय २६, रा. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे हे करीत आहेत. या संपूर्ण मोहिमेत दुय्यम निरीक्षक विवेक कदम, वाहनचालक रणजित शिंदे, जवान दीपक वायदंडे, सतीश चौगुले, अभिषेक खत्री, आणि सागर सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला. या संयुक्त कारवाईने गोवा-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून, स्थानिक पातळीवर या यशस्वी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg