सावंतवाडी (प्रतिनिधी) - कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेल्या हत्तींच्या कळपाने गेली २३ वर्षे महाराष्ट्र (दोडामार्ग, सावंतवाडी, चंदगड) आणि गोवा या राज्यांत शेती आणि मानवी वस्तीसाठी धोका निर्माण केला आहे. याच कळपातील सुमारे १० ते १२ वर्षांचा ’ओंकार’ नावाचा एकटा हत्ती सध्या महाराष्ट्र-गोवा सीमेवर धुमाकूळ घालत आहे. या हत्तीला पकडण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून, त्याला आणि इतर आठ हत्तींना कोल्हापूर हत्ती कॅम्प येथे ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ’ओंकार’ ला पकडल्यानंतर कोल्हापूर हत्ती कॅम्पमध्ये ठेवण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. कोल्हापूर येथे हत्ती कॅम्प विकसित केला जात आहे. मात्र, ’ओंकार’ला पकडल्यावर नेमके कुठे ठेवले जाईल, हे आत्ताच सांगता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पकडलेल्या हत्तींना आपल्याकडे ठेवण्यास कर्नाटक राज्याने नकार दिला आहे. ’ओंकार’ हत्ती कळपापासून वेगळा झाल्यानंतर त्याने दोडामार्ग तालुक्यातील एका ७० वर्षीय वृद्धाला चिरडले होते. त्यानंतर त्याला पकडण्याचा निर्णय झाला, मात्र अतिवृष्टीमुळे हे शक्य झाले नाही. ’ओंकार’ने १३ सप्टेंबर रोजी गोव्यात प्रवेश केला आणि २७ सप्टेंबरपर्यंत १४ दिवस तो गोवा राज्यात होता.
या काळात त्याने उत्तर गोव्यातील मोपा, कडशी मोपा, तोरसे आणि तांबोसे या भागांतील भातशेती आणि नारळाची झाडे मोडून मोठे नुकसान केले. २८ सप्टेंबर रोजी तो पुन्हा महाराष्ट्रातील सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे परिसरात परतला. तो सध्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवरील तेरेखोल नदीच्या परिसरामध्ये वावरत आहे, जो पकडण्यासाठी योग्य नाही. महाराष्ट्रात सध्या एकूण आठ हत्तींचा वावर आहे. यात ’ओंकार’सह सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात सहा, तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दोन हत्ती आहेत. या सर्वांना कोल्हापूर हत्ती कॅम्पमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने ’ओंकार’ला ३१ डिसेंबरपर्यंत पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या बचाव मोहिमेसाठी वन कर्मचारी, पशुवैद्य आणि पोलीस दलातील कर्मचार्यांचा समावेश असलेली एक टीम तयार आहे. हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी ५० स्थानिक तरुणांना (हाकारे देणारे) नेमण्यात आले आहे.
’ओंकार’ला परत पाठवण्याची मोहीम यशस्वी करण्यासाठी योग्य वेळी कर्नाटक कुमकी हत्तींसह तज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी आणि गावकर्यांनी वनविभाग आणि राज्य सरकारवर दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वारंवार मागणी करूनही हत्तींना पकडण्यासाठी कोणतीच कार्यवाही होत नसल्याने नुकसान वाढत असल्याचा रोष ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. हत्तींमुळे झालेल्या नुकसानीपोटी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात सन २०२२-२०२३ ते २०२४-२०२५ या तीन वर्षांत ५६२९ प्रस्तावांवर ३९३.३५ लक्ष रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे मानवी हल्ल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. काजूच्या हंगामात दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथील लक्ष्मण गवस यांचा ’ओंकार’ नावाच्या हत्तीने चिरडल्याने बळी घेतला होता. वनविभागाकडून हत्तींना लोकवस्तीतून सुरक्षित अंतरावर पिटाळून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जातो, जेणेकरून ते बिथरून मानवावर हल्ला करणार नाहीत, असे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींची ही समस्या आता शेती आणि मनुष्य यांच्यासाठी मोठा धोका बनली असून, वनविभागासमोरील आव्हान वाढले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.