खेड (दिलीप देवळेकर) - खेड नगरपरिषदेवर महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सोमवारी सकाळी खेड शहरात दाखल झाले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा माधवी बुटाला आणि सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी ते आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, “हा विजय माझा नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. राज्यमंत्री योगेश कदम, आमचे उपनेते संजय कदम, सदानंद चव्हाण, राजन साळवी, किरण भैया सामंत आणि संपूर्ण टीमने एकत्रितपणे काम केल्यामुळेच रत्नागिरी जिल्ह्यात ९९ टक्के स्ट्राईक रेट राखता आला. शिवसेना-भाजपला खेडवासीयांनी भरभरून दिलेले मत हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.” खेड नगरपरिषदेबाबत आश्वासन देताना ते म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा इथे आलो आहे. खेड नगरपरिषदेला नियोजन मंडळातून एकही रुपया कमी पडू देणार नाही, हे मी खेडवासीयांना आश्वस्त करतो.” महायुतीची सत्ता आल्याने विरोधकांचा पूर्णपणे पराभव झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘सामना’ मधील बातमीवर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले, “आम्ही सामना मधली बातमी मनावर घेत नाही आणि जनतेनेही घेऊ नये. जर ईव्हीएमवर एवढे आक्षेप असतील, तर सर्वप्रथम केंद्रात राहुल गांधींनी राजीनामा दिला पाहिजे, कारण तेही ईव्हीएमवरूनच निवडून आले आहेत. तसेच यूबीटी गटाचे आमदार-खासदारही ईव्हीएमवरून निवडून आलेले आहेत. ही दुटप्पी भूमिका असून हा राजकीय बालिशपणा आहे आणि महाराष्ट्र तो मनावर घेत नाही.” आगामी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली २९ पैकी २९ महानगरपालिकांवर महायुतीचा भगवा फडकणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आमदार शेखर निकम यांच्या ‘स्वबळा’च्या नार्यावर प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले की, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते, मात्र शिवसेना आणि भाजप या जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक एकत्रितपणे लढणार आहेत. कोकणातील उद्योगांबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “कोकणच्या निसर्गाला किंवा येथील नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणारा कोणताही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. एखादी कंपनी लोटे परशुराम किंवा कोकणातील कुठल्याही भागात घातक उत्पादन करणार असेल तर ती आम्ही थांबवू.” इटलीमध्ये बंद झालेली एक कंपनी सध्या भारतात आली असून ती रत्नागिरी जिल्ह्यातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीने घेतल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यावर स्पष्टीकरण देताना सामंत म्हणाले की, “या संदर्भात सोशल मीडियावर जे काही पसरवले जात आहे त्याची मी स्वतः पडताळणी करत आहे. कोणतीही कंपनी येताना तिचे उत्पादन, तंत्रज्ञान आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय शासन कोणताही निर्णय घेणार नाही. कोकणच्या निसर्गाला किंवा लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचेल, असे काही असेल तर ती कंपनी आम्ही इथे येऊ देणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. पिफास प्रकरणाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, सध्या तिथे क्लोरीनचे उत्पादन सुरू असून युरो अल्काइनचे ट्रायल बेसिसवर एक टक्क्यापेक्षा कमी उत्पादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि त्याचे विघटन तळोजा येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीला चार ऑक्टोबरला नोटीस दिली असून त्यांचे उत्तर अद्याप आलेले नाही. केंद्रीय प्रदूषण मंडळाची भूमिकाही विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “कोकणवर परिणाम करणारा कोणताही प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन सखोल तपासणी केली जाईल आणि काही घातक आढळल्यास तो प्रकल्प बंद केला जाईल,” असा ठाम निर्धार सामंत यांनी व्यक्त केला.


















































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.