loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (प्रतिनिधी) - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे ही सर्वपक्षीय कृती समितीची ठाम भूमिका असल्याचे समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. येथील विमानतळावरून पहिले प्रवासी विमान उड्डाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि.बा. पाटील यांनी या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. त्यांच्या या योगदानाची ओळख म्हणून या विमानतळाला ‘दिबा’साहेबांचेच नाव दिले पाहिजे ही आमची ठाम आणि रास्त मागणी आहे. या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने तसेच स्थानिक भूमिपुत्रांच्या पुढाकारातून यापूर्वी विविध आंदोलने करण्यात आली. या आंदोलनांमुळे आमच्यावर अनेक केसेस झाल्या. गेल्याच महिन्यात या केससाठी मी आणि दशरथदादा पाटील यांच्यासह भूमिपुत्र उरणच्या कोर्टात हजर होतो. या संदर्भात आम्हाला जामीन घेण्याची ही वेळ आली तरीही आम्ही मागे हटलेलो नाही. ‘दिबा’साहेबांच्या नावासाठी आमचा पाठपुरावा अखंड सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृती समितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे की, या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल. कालही त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत लवकरच नामकरणाचा निर्णय होईल आणि विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव दिले जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ‘दिबा’साहेबांचे नाव या विमानतळाला लवकरच मिळेल, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आपल्या खासदारकीच्या काळातील आठवणी सांगताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, मी खासदार असताना सिडकोचे अधिकारी या प्रकल्पासंदर्भात मला भेटत होते. १९९८-९९पासून गेली तब्बल २५ वर्षे या विमानतळासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र दीर्घकाळ प्रकल्पाला अपेक्षित गती मिळत नव्हती. नंतरच्या काळात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात या विमानतळाला खर्‍या अर्थाने गती मिळाली आणि आज ते प्रत्यक्षात सुरू झाले आहे. विमानतळ सुरू झाल्यामुळे या संपूर्ण विभागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून उद्योग, व्यापार आणि आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल. हे विमानतळ केवळ वाहतुकीचे केंद्रबिंदू नसून नवी मुंबई व रायगड जिल्ह्याच्या विकासाचा नवा अध्याय ठरणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg