loader
Breaking News
Breaking News
Foto

पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात PFAS रसायन उत्पादन तातडीने बंद करा, उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर

संगलट (खेड )(प्रतिनिधी) : पश्चिम घाटाच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये सुरू असलेले PFAS या अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन तातडीने व कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी ठाम मागणी पत्रकार तथा पर्यावरणवादी सामाजिक कार्यकर्ते अनुज अनंत जोशी यांनी आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या निवेदनात माधव गाडगीळ समिती, कस्तुरीरंगन (रंगनाथ) समिती आणि महाराष्ट्र शासनाच्या राणे समितीच्या शिफारशींचा स्पष्ट संदर्भ देत, पश्चिम घाट व कोकणात पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला दीर्घकालीन धोका निर्माण करणाऱ्या रासायनिक उद्योगांवर निर्बंध घालण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनुज जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीतील Miteni S.p.A. ही कंपनी PFAS प्रदूषणामुळे २०१८ मध्ये बंद पडली होती. या कंपनीमुळे इटलीतील व्हेनेटो प्रांतातील सुमारे ३.५ लाख नागरिकांचे पिण्याचे पाणी दूषित झाले होते. या प्रकरणात जून २०२५ मध्ये इटलीच्या न्यायालयाने कंपनीच्या ११ माजी अधिकाऱ्यांना एकूण तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हीच जुनी मशिनरी व तंत्रज्ञान भारतात आणून लोटे परशुराम येथे वापरले जात असल्याची माहिती निवेदनात नमूद करण्यात आली आहे. PFAS ही तथाकथित “फॉरेव्हर केमिकल्स” असून ती निसर्गात नष्ट होत नाहीत, पाणी व भूगर्भातील जलसाठे कायमस्वरूपी दूषित करतात आणि मानवी शरीरात साठून कर्करोग, यकृत विकार, थायरॉईड, हार्मोनल असंतुलन व वंध्यत्वासारख्या आजारांना कारणीभूत ठरतात, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. लोटे परशुराम परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणाने त्रस्त असून, या प्रकल्पामुळे वशिष्टी नदी, शेती, मासेमारी आणि कोकणातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर, PFAS उत्पादन तातडीने बंद करणे, संबंधित कंपनीला देण्यात आलेली स्थापना व संचालन परवानगी रद्द करणे, प्रकल्पाची स्वतंत्र पर्यावरणीय व आरोग्यविषयक चौकशी करणे तसेच परिसरातील नागरिकांच्या पाणी, माती व रक्त नमुन्यांची शासकीय तपासणी करण्याच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या निवेदनाची दखल घेत संबंधित विभागांकडून माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg