loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण नगरपालिका निवडणुकीत आम. निलेश राणे यांची बाजी

मालवण (प्रफुल्ल देसाई) - राज्यात विशेषतः सिंधुदुर्गात हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निकालात मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी नगराध्यक्षासह दहा नगरसेवक विजयी करून दाखविले आहेत. आमदार निलेश राणे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना साथीला घेताना भाजपच्या म्हणण्यानुसार मालवणात शून्य असणाऱ्या शिंदे शिवसेनेने जणू चमत्कार घडवीत नगराध्यक्षासह पन्नास टक्के नगरसेवक निवडून आणण्यात जे यश मिळविले आहे ते भाजप आणि उबाठा शिवसेना या दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. एकूणच मालवण नगरपालिकेचा निवडणूक निकाल पहिल्यानंतर आम. निलेश राणे यांनी भाजपला जी धोबीपछाड दिली आहे, त्याची रंगतदार चर्चा आता सुरु झाली आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या काळात शिंदे शिवसेनेबाबत जो अतिशहाणपणा दाखविला त्याची फळे भाजपला भोगावी लागली हा या निवडणूक निकालाचा अन्वयार्थ आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मालवण शहरातील अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी महायुतीबाबत विधाने करताना राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असणाऱ्या शिंदे शिवसेनेबाबत डिवचणारी जी विधाने केली त्या विधानांमुळेच भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली. भाजपच्या मालवणातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेना मालवणात शून्य असल्याचे विधान केले होते त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली. हे विधान करताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे तेरा विद्यमान नगरसेवक असल्याने नगराध्यक्ष पदाची दावेदारीही केली होती. यावर शिंदे शिवसेनेने मालवणचे आमदार म्हणून निलेश राणे हे कार्यरत असल्याने नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेने आग्रह धरला. मात्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपली हेकेखोर वृत्ती सोडली नाही. उलट पत्रकार परिषदा घेऊन शिंदे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. राज्यात गळ्यात गळे घालून वावरणारे भाजप शिंदे शिवसेना या पक्षांच्या नेते मंडळींमध्ये मालवणात मात्र मने दुखावली गेली. यातच भाजपने शिंदे शिवसेनेला चार जागा देऊ असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

आम. निलेश राणे यांनी ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या कार्यशैलीवर जो बॉम्ब टाकला तो बॉम्ब मालवणच नव्हे, जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हलचल माजवून देणारा ठरला. निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरात आम. राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपने मतदारांना वाटण्यासाठी लाखो रुपये आणल्याचा आरोप केला. यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात मोठे घमासान झाले होते. एकीकडे ही पार्श्वभूमी असताना भाजपनेही प्रचाराच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना प्राचारसाठी उतरविले. तर शिंदे शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रचारसभा घेण्यात आली. एकीकडे शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या राजकीय घडमोडी घडत होत्या त्याचवेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी संयमी व्युहरचना आखत काँग्रेसच्या मदतीने निवडणूक यंत्रणा राबवली. भाजपमधील माजी नगरसेविका पूजा करलकर यांनी भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळाल्याने ऐन निवडणुकीत उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उबाठा शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. उबाठा शिवसेनेने करलकर यांना उमेदवारी देताना नगरसेवक पदासाठी अनेक नवीन चेहऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरविले. एकूणच मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या या रणसंग्रामात शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्षासह दहा नगरसेवक निवडून आल्याने मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर भाजपला पाच जागांवर आणि उबाठा शिवसेनेला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg