चिपळूण (वार्ताहर) : ‘‘कोण म्हणतो मी ५ कोटी... तर कोण म्हणतो मी ८ कोटी उडवणार... इतके पैसे उडवून नगरपालिकेत काय वसुली करायला जाणार का...? चिपळूण ही सांस्कृतिक भूमी आहे. नटवर्य काशिनाथ घाणेकरांची ही भूमी आहे. कोट्यवधींची भाषा करून या भूमीचे पावित्र्य नासवू नका, अशा खणखणीत शब्दात माजी आमदार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशभाई कदम यांनी कोट्यवधींची भाषा करणार्यांना सडेतोड सुनावले. मी पैसे उडवणार नाही आणि नगरपालिकेत गेल्यानंतर एकही रुपया घेणार नाही. ही शपथ घेऊन मी निवडणुकीत उतरलो आहे, असेही त्यांनी विशेष मुलाखतीत सांगितले. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आता अंतिम टप्पा सुरू झाला असून रमेशभाई कदम यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी दै. ‘रत्नागिरी टाइम्स’साठी वेळ काढून विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपले व्हिजन स्पष्ट शब्दात मांडले.
निवडणुका या विधायक आणि विकासकामावर लढवल्या गेल्या पाहिजेत. शहर विकासाचा स्वच्छ सुंदर आराखडा जनतेसमोर ठेवा आणि मते मागा, जनता योग्य निर्णय घेईल. गेल्या ४० वर्षात मी येथील जनतेची ज्या पद्धतीने सेवा केली, शहराच्या विकासासाठी आम्ही काय-काय केले आणि पुढील ५ वर्षात काय करणार आहोत हे जनतेसमोर ठेवून मते मागत आहोत. मी कोणतेही आमिष दाखवलेले नाही अथवा दाखवणार नाही. कारण मला नगर परिषदेत जाऊन काही कमवायचे नाही तर नगर परिषदेची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची नगर परिषद म्हणून नावलौकिक मिळवायचा आहे आणि त्यासाठीच नागरिकांनी मला या निवडणुकीत उतरवले आहे, अशा स्पष्ट शब्दात रमेशभाई कदम यांनी आपली भूमिका मांडली. रमेशभाई कदम म्हणजे राजकारणातील एक धुरंधर नेते. ते म्हणाले, ‘‘मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे संस्कार झालेले आहेत. त्यामुळे मी नेहमी मर्यादेत राहून राजकीय टीकाटिप्पणी करत राहिलो, पण आज माझ्या प्रकृतीबाबत बोलले जात आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका केली जात आहे. त्या लोकांना इतकेच सांगतो, एकदा पहाटे माझ्याबरोबर चालायला या, म्हणजे माझी प्रकृती तुम्हाला समजेल. चिपळूण शहरात किती मजल्याच्या किती बिल्डिंग आहेत याची पूर्ण माहिती मला आहे. त्यामुळे नको ते विषय पुढे आणून निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
मी कोणत्याही संविधानिक पदावर नसताना आजही माझ्या घरी सर्वसामान्य लोकांची रांग असते. सकाळपासून लोक येत असतात. कारण त्यांना माहिती आहे. याठिकाणी कोणतेही आढेवेढे न घेता समस्या सोडवल्या जातात. मग ती समस्या आरोग्य विषयक असो किंवा प्रशासकीय असो. माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. अनेक रुग्णांना मी सिद्धिविनायक ट्रस्ट असो वा अन्य कोणतेही संस्थान असो, मी मदत मिळवून दिली आहे. खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील अनेकांना सहकार्य मिळवून दिले आहे. कोरोना काळात तर एक-एक जीव वाचवण्यासाठी मी केलेले प्रयत्न येथील नागरिकांनी बघितले आहेत. हे उपकार नव्हेत तर मी कर्तव्य भावनेने जनतेची केलेली सेवा असून मला त्याचे समाधान आहे, असेही रमेशभाईंनी सांगितले. शहरात गेल्या काही वर्षात नवीन असे काहीच झालेले दिसत नाही. मटण-मच्छी मार्केट, सांस्कृतिक केंद्र हे कित्येक वर्षाच्या जुन्या इमारतींमध्येच आहे. त्यांची फक्त दुरुस्ती झाली. दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये उडवले गेले. नवीन असे काहीच झालेले नाही. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शहरात नगरपालिकेचे आरक्षित असे अनेक भूखंड आहेत. ते विकसित करून लोकहिताचे प्रकल्प राबवले गेले पाहिजेत. छोट्या उद्योजकांसाठी बहादूरशेख येथे भूखंड आरक्षित आहे. ते जर विकसित केले तर शहरातील अनेक तरुणांना हक्काचा रोजगार मिळेल. त्यासाठी मी तातडीने प्रयत्न करणार आहे, अशी अत्यंत लोकहिताची संकल्पना रमेशभाई कदम यांनी मांडली.











































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.