loader
Breaking News
Breaking News
Foto

राजकारण बदमाशांचा खेळ,बाळ मानेंचा अनुभव पाहता ते तंतोतंत पटले : संतप्त इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

रत्नागिरी (प्रतिनिधी) - ‘‘इं. कॉंग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे, परंतु रत्नागिरीचे बाळ माने बोलतात एक आणि करतात भलतेच. त्यांच्यावर आता विश्‍वास राहिलेला नाही.. त्यांनी इं. कॉंग्रेसची केवळ फसवणूक केली असे नव्हे तर शेवटपर्यंत इं. कॉंग्रेसला खेळवून खेळवून तोंडघशी पाडले. त्यामुळे रत्नागिरी न. प. निवडणुकीत आता ‘महाविकास आघाडी’ हा शब्द राहणार नाही.. जेथे कॉंग्रेसचे उमेदवार नसतील तेथे आमचे मतदार सुयोग्य उमेदवाराला मत देतील’’ अशी संतप्त प्रतिक्रिया रत्नागिरीतील इं. कॉंग्रेस जनातून व्यक्त करण्यात येत आहे. इं. कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते श्री. रमेश कीर यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकी वस्तुस्थिती खुलेआम सर्वांसमोर मांडली. सर्व बाबी समोर येताच इं. कॉंग्रेसजन विलक्षण संतापले. श्री. रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, ‘‘निवडणूका जाहीर झाल्यावर आम्ही इं. कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उबाठा) असे तिघांनी एकत्र येऊन रत्नागिरी न. प.ची निवडणूक महाविकास आघाडीतर्फे लढवण्याचे निश्‍चित केले होते. श्री. बाळ माने हे पहिल्यापासून आमच्या संपर्कात होते, आम्ही सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली आणि अत्यंत सामंजस्याने आम्ही जागा वाटप केले.’’ ‘‘इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने अत्यंत सामंजस्याने चर्चेत १ नव्हे तर २-२ पावले मागे घेऊन जागा वाटप खेळीमेळीच्या वातावरणात केले. महाविकास आघाडीत इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या वाट्याला अतिशय कमी जागा आल्या परंतु ते देखील आम्ही मोठ्या मनाने व सामंजस्याने स्वीकारले. असे सर्व असताना श्री. बाळ माने हे ज्याप्रकारे आमच्याशी वागले तो सारा प्रकार संतापजनक असा होय’’ असे श्री. रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जागा वाटपानुसार रत्नागिरी न. प. मध्ये इं. कॉंग्रेसच्या वाट्याला ३ व राष्ट्रवादी (शरद पवार) च्या वाट्याला ३ जागा देण्यात आल्या होत्या. त्यांनी इमाने इतबारे एवढ्याच उमेदवारांचे फॉर्म दाखल केले. फॉर्म भरायची मुदत संपल्यानंतर फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परंतु आता आणखी उमेदवार उभे करणे शक्य नाही त्यामुळे इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी आपल्या फॉर्म भरलेल्या मोजक्या उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. श्री. रमेश कीर यांनी पुढे सांगितले, ‘‘चर्चेनुसार आम्ही अत्यंत कमी जागा स्वीकारल्या.. आम्ही १ नव्हे तर २ पावले मागे आलो.. त्यानुसार आम्ही आमच्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवार उभे केले. तसेच दि. १७ नोव्हें. रोजी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी आपल्या उमेदवारांचे एबी फॉर्म सादर केले. त्याच दिवशी बाळ माने यांनी केलेली धक्कादायक गोष्ट आम्हाला समजली’’ अशा शब्दात त्यांनी सारे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले, ‘‘धक्कादायक बाब म्हणजे श्री. बाळ माने यांनी आमच्या वाटेच्या जागांवरही त्यांच्या पॅनेलचे उमेदवार उभे केले व त्यांना एबी फॉर्मदेखील दिले. आम्ही तात्काळ त्याचदिवशी त्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा फॉर्म मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दि. २१ नोव्हें. रोजी आमचे उमेदवार अर्ज मागे घेतील असे श्री. बाळ माने यांनी सांगितले.. परंतु खेदाची बाब अशी की त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही’’ अशा संयमी शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. श्री. रमेश कीर यांनी पुढे सांगितले, ‘‘बाळ मानेंनी त्यावेळी सांगितले होते की दि. २१ रोजी आम्ही अर्ज मागे घेऊ, काळजी करु नका.. कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून आम्ही असे अर्ज दाखल केले आहेत. आम्ही पुन्हा त्यांच्या शब्दावर विश्‍वास ठेवला. परंतु आम्हाला जो अनुभव आला तो अतिशय धक्कादायक आहे’’ असे रमेश कीर यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांची रत्नागिरी न.प. निवडणुकीत फसवणूक झाल्याचे उघड होताच दोनही कॉंग्रेसचे कार्यकर्ते विलक्षण संतापले. ‘हे कसले फसवणूकीचे राजकारण?’ असा संतप्त सवाल आता दोन्ही कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते विचारु लागले आहेत. आता मुदत संपल्याने फॉर्मही भरता येत नाहीत, अशा स्थितीत निवडणुक रिंगणात जे कोणी सुसंस्कृत व कर्तबगार उमेदवार असतील त्यांना आम्ही मते देऊ परंतु इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची अशा प्रकारे फसवणूक करणार्‍यांना कदापि मतदान करणार नाही असे आता दोन्ही कॉंग्रेसचे संतप्त कार्यकर्ते उघडपणे सांगू लागले आहेत. श्री. रमेश कीर यांनी पुढे नमूद केले की, ‘‘त्यांनी पुन्हा आपला शब्द पाळला नाही व त्यांच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेतले नाहीत. त्यांची ही कार्यपध्दती पाहून आम्हाला फार मोठा धक्का बसला.. राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे असे ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सांगितल्याचे आम्ही ऐकले होते. परंतु आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला’’ अशा शब्दात त्यांनी खंत व्यक्त केली. श्री. रमेश कीर यांनी पुढे सांगितले, ‘‘मी अतिशय संयमी व मोजक्या शब्दात सांगत आहे. मला आता कुणावर काहीही टीका टिपणी करायची नाही.. माझी इच्छाही नाही.. त्यांनी शब्द देऊनही आमच्या जागांवर उभे केलेले उमेदवार मागे घेतले नाहीत.. मग ‘आघाडी’ या शब्दाला काय अर्थ राहतो? त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे की रत्नागिरी न. प. मध्ये ‘महाविकास आघाडी’ नसेल.. इं. कॉंग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीतून बाहेर पडत आहोत’’ असे श्री. रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत त्वरीत जाहीर केले. त्यांनी पुढे सांगितले, ‘‘शहर इं. कॉंग्रेस व शहर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आम्ही एकत्रितपणे लढू.. आता आम्हाला सर्व इच्छुकांचे फॉर्म भरता येणार नाहीत.. आम्हाला शेवटपर्यंत अंधारात ठेवून आमची फसवणूक झाली.. आता महाविकास आघाडी रत्नागिरीत नसेल.. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक पक्षातर्फे लढावे.. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.. आम्ही मात्र दोन कॉंग्रेस एकत्रितपणे ही लढत लढवू.. आमच्या ज्या मोजक्या उमेदवारांचे शेवटच्या दिवसापर्यंत जे फॉर्म भरले आहेत त्या उमेदवारांना विजयी करण्याचा आमचा प्रयत्न राहील’’ अशा शब्दात श्री. रमेश कीर यांनी बाळ मानेंचा आलेला अनुभव विषद केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg