loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूणमध्ये ७२ वा अखिल भारतीय सहकार सप्ताह उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी): "कोकणातील तरुणांनी आता मुंबई-पुण्याच्या नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या गावातील शेतीत लक्ष घालण्याची गरज आहे. हिंमत हरलेला योद्धा कधीच युद्ध जिंकू शकत नाही, त्यामुळे जिद्दीने शेती करा आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधा," असे प्रतिपादन कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केले. चिपळूण येथे ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हा मेळावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव कृषी महाविद्यालय (मांडकी पालवण) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक आमदार शेखर निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि जिल्हा उपायुक्त (पर्यटन व दुग्ध व्यवसाय) डॉ. दत्तात्रय सोनावले उपस्थित होते. या मेळाव्यात सुमारे २५० हून अधिक विविध कार्यकारी सोसायट्यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आपल्या रोखठोक भाषणात डॉ. चोरगे यांनी तरुण पिढी आणि शेतकऱ्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. ते म्हणाले, "केवळ नेत्यांच्या मागे फिरून किंवा फुकट मिळणाऱ्या योजनांवर अवलंबून राहून पोट भरणार नाही. कितीही प्रगती झाली तरी भात आणि गहू हे कारखान्यात तयार होत नाहीत, ते शेतातच पिकवावे लागतात. कष्ट करायची तयारी ठेवा. मुंबईत १०-१२ हजारांची नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेती आणि पूरक व्यवसाय करा, जिथे शुद्ध हवा, स्वतःचे घर आणि स्वाभिमान आहे."

टाईम्स स्पेशल

सहकारी संस्थांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी केरळमधील सहकारी संस्थांचे उदाहरण दिले. "केरळमध्ये सोसायट्या बँकांसारख्या चालतात आणि कोट्यवधींचा व्यवसाय करतात. आपल्या विकास सोसायट्यांनी केवळ कर्ज वाटप न करता गावातील किमान १० तरुणांना तरी स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतीमध्ये मजुरांच्या टंचाईवर उपाय म्हणून यांत्रिकीकरणाचा आग्रह त्यांनी धरला. "नांगरणीपासून कापणीपर्यंत आता यंत्रे उपलब्ध आहेत. 'कम्बाईन हार्वेस्टर' सारखी यंत्रे घेण्यासाठी ५ गावांनी एकत्र येऊन नियोजन केले तर हे सहज शक्य आहे. एकत्र येऊन शेती केली तरच ती परवडेल," असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील टेरवकर यांनी केले, तर जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ गराटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg