loader
Breaking News
Breaking News
Foto

खड्डेमय झरेबांबर-उसप रस्त्याची त्वरित डागडुजी न झाल्यास उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांचा खड्ड्यात बसून आंदोलनचा इशारा

तिलारी (प्रतिनिधी) : झरेबांबर ते उसप या महत्त्वपूर्ण रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून झालेली दुरवस्था आणि त्याविरोधात जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दाखवलेल्या अनास्थेमुळे शिवसेना (उबाठा) महिला आघाडी उप जिल्हाप्रमुख विनिता घाडी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्याची त्वरित डागडुजी न झाल्यास, थेट 'खड्ड्यांमध्ये बसून' तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी यांनी प्रशासनाला दिला आहे. पावसाला तीन महिने उलटून गेले असले तरी, बांधकाम विभागाने या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही हालचाल केलेली नाही. संपूर्ण मार्गावर विखुरलेले मोठे दगड, खोल खड्डे आणि मधोमध साचलेला चिखल यामुळे वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ही परिस्थिती सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या धोकादायक रस्त्यामुळे होणारे अपघात, शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय आणि घरगुती तसेच शेती उपयोगी वाहनांचे होणारे नुकसान याबद्दल विनिता घाडी यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर घणाघाती टीका केली. "प्रशासन पूर्णपणे झोपले आहे. नागरिक त्रस्त आहेत आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी गप्प आहेत," असा थेट आरोप त्यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

"आम्हाला केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष रस्त्याचे काम झालेले पाहायचे आहे," असे ठणकावून सांगत घाडी यांनी प्रशासनाला अंतिम इशारा दिला. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती न घेतल्यास, महिला आघाडीच्या वतीने खड्ड्यात बसून आंदोलन सुरू करण्यात येईल आणि त्यानंतरही दखल न घेतल्यास या समस्येवर मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी त्यांची आक्रमक भूमिका आहे. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, "कोटी-कोटींच्या गप्पा मारणारे आज रस्त्याच्या प्रश्नावर शांत बसले आहेत, पण जनता मात्र रोज त्रास सहन करत आहे. अशा निष्क्रिय कारभाराचा आम्ही जाब विचारणारच." दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही बांधकाम विभागाच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार निवेदन देऊनही कोणताही ठोस उपाय निघाला नाही. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही अडथळे येत असून रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महिला आघाडीच्या या स्पष्ट आणि कडक इशाऱ्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग काय ठोस पाऊल उचलतो, याकडे आता झरेबांबर-उसप परिसरातील सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg