loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘सोशल मीडिया लॅब’चे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी: कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (भा.पो.से.) यांच्या हस्ते सोमवारी रत्नागिरी पोलीस दलाच्या नूतन आणि अद्ययावत ‘सोशल मीडिया लॅब’चे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, रत्नागिरी पोलीस दलाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या उद्घाटन प्रसंगी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. सध्याच्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून सोशल मीडियाचा वापर करून अफवा पसरवणे किंवा फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी ही ‘सोशल मीडिया लॅब’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या लॅबच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पोलिसांचे बारीक लक्ष असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रामुख्याने समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्यास त्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी ही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. यामुळे समाजकंटकांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या लॅबचा वापर केवळ देखरेखीसाठीच नव्हे, तर ‘प्रॉडक्टिव्ह पोलीसिंग’साठी प्रभावीपणे केला जाणार आहे. सोशल मीडियावर सध्या काय ट्रेंड सुरू आहेत, याचा तांत्रिक मागोवा घेऊन भविष्यात कोणता अनुचित प्रकार किंवा गुन्हा घडू शकतो का, याचा अंदाज पोलिसांना घेता येणार आहे. अशा प्रकारे संभाव्य धोके ओळखून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ही लॅब रत्नागिरी पोलिसांसाठी ‘तिसरा डोळा’ ठरणार आहे. या आधुनिक प्रणालीमुळे गुन्हे उकल करण्याच्या प्रक्रियेलाही वेग येणार आहे.

टाइम्स स्पेशल

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि सतर्कतेने करावा. कोणतीही माहिती किंवा मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहावी आणि जबाबदार नागरिक म्हणून वागावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही लॅब सुरू झाल्यामुळे आता सायबर गुन्हेगार आणि अफवा पसरवणारे पोलिसांच्या रडारवर असणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सायबर गुन्हेगारीवर राहणार पोलिसांचा ‘वॉच’

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg