तिलारी (प्रतिनिधी) : कोनाळकट्टा ते घोटगेवाडी या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. विशेष म्हणजे घोटगेवाडीसह मोर्ले आणि केर या गावांना जोडणारा हा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग असल्याने, या रस्त्याच्या दुरवस्थेचा मोठा फटका या तिन्ही गावांतील ग्रामस्थांना बसत आहे. सध्या या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणी कसरत ठरत आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून सर्वत्र केवळ खडी आणि मोठमोठ्या दगडांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता कमी अंतराचा असल्याने अनेक ग्रामस्थ आणि वाहनचालक याचा नियमित वापर करतात.
मात्र, सध्याची अवस्था पाहता वेळेची बचत होण्याऐवजी खड्ड्यांमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुचाकी चालवताना वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले असून, अपघाताची टांगती तलवार कायम आहे. केवळ वाहनचालकच नव्हे, तर या खडकाळ रस्त्यावरून पायी चालणेही वृद्ध आणि शाळकरी मुलांसाठी कष्टाचे झाले आहे. मोर्ले आणि केर गावांतून कोनाळकट्टा किंवा बाजारपेठेत येण्यासाठी हा मुख्य दुवा असतानाही, प्रशासनाने याकडे सोयीस्कर डोळेझाक केल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे.
रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे होणारा नाहक त्रास थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. हा मार्ग महत्त्वाचा असल्याने केवळ मलमपट्टी न करता रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी कोनाळकट्टा, घोटगेवाडी, मोर्ले आणि केर येथील ग्रामस्थांकडून होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.