loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहराचा परिपूर्ण विकास हाच महायुतीचा ध्यास! नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सावली कुरुप यांचा संकल्प

केळंबे (लांजा) (सिराज नेवरेकर) : विकसनशील अशा लांजा शहराला विकसित शहर करणे ही महायुतीची आणि आम्हा सर्वांची प्राथमिकता आहे आणि त्यासाठीच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. लांजा स्मार्ट शहर होईल यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जनतेने त्यासाठी आम्हाला भरभरून मतदान करावे, असे आवाहन शिवसेना-भाजप युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सावली कुरुप यांनी केले आहे. लांजा शहराचा परिपूर्ण विकास हाच माझा ध्यास आहे, असेदेखील त्या म्हणाल्या. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सावली सुनील कुरुप यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दै. ‘रत्नागिरी टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपली विकासाची संकल्पना मांडली. लांजा-राजापूरचे कार्यसम्राट आ. किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेतृत्व आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा कुवे शहराचा सर्वांगीण विकास करून पुढच्या पाच वर्षांत लांजा स्मार्ट शहर होईल, असा विश्‍वास त्यांनी आपल्या मुलाखतीत सुरुवातीलाच व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांज्यात कुरुप कुटुंबीय प्रसिद्ध असून त्यांना जनसेवेचा समृद्ध वारसा लाभला आहे. सावली सुनिल कुरुप यांनी सांगितले की, माझे पाचवीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर माझे हर्दखळे गावी आणि त्यानंतर पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण लांजा महाविद्यालयात झाले. माझे आजे सासरे तात्या कुरूप हे लांजा शहराचे बरेच वर्ष सरपंच होते. माझे मोठे दीर कै. सुधाभाई कुरुप सामाजिक कार्यकर्ते होते, माझे पती सुनिल नारायण कुरुप यांनीही कमी वयात सरपंच तसेच उपसभापती, नगराध्यक्ष अशी विविध पदे भूषविली. असा समाजसेवेचा वारसा आमच्या कुटुंबाला लाभला आहे याचा मला अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. माझे पती सुनिल कुरुप यांनी शहरातील अनेक विकासकामे केली आहेत. तसेच लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्यासारखे खंबीर नेतृत्व लाभले आहे. त्यांनी लांजा शहरात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे हे सर्वांना ज्ञात आहे. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लांजा विकसित करण्यासाठी जनतेचा कौल मागत आहोत. तो आम्हाला मिळेल, असा विश्‍वासही सौ. सावली कुरुप यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

मी नगराध्यक्ष झाल्यानंतर पिण्याचे पाणी, पाण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. शहरवासीयांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळावे या उद्देशाने पावले उचलली आहेत. शहरातील मूलभूत गरजा, रस्ते, पथदीप दिवे, सांडपाण्याची व्यवस्था या सुविधांकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देणार आहोत. त्याचप्रमाणे महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे विस्थापित झालेल्या कुटुबांकडे मी गांभीर्याने पाहणार आहे. फेरीवाले, भाजीवाले यांना मी माझे कुटुंबीय मानते. ३०० कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांना मी विस्थापित होऊ देणार नाही, अशी ग्वाही सावली कुरुप यांनी दिली. महिलांसाठी प्रत्येक प्रभागात बचत गट सुरू करणार आहे. मुली आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणार असून कराटे आणि अन्य खेळांसाठी विशेष क्रीडा संकुल उभारण्याची गरज आहे. सत्तेवर येताच त्याला मी प्राधान्य देईन, अशी ग्वाही सौ. कुरुप यांनी दिली. तसेच नगरपंचायतीच्या विविध योजनांचा लाभ महिलांना मिळावा या हेतूने नगर पंचायतीमध्ये एक स्वतंत्र कक्ष उभारण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला. प्रचाराला फिरत असताना प्रत्येक प्रभागातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. आ. किरण सामंत यांनी केलेली विकासकामे, माझे पती राजू कुरूप यांनी केलेली विकासकामे आणि कुरुप कुटुंबियांवर लांजावासियांचे असलेले प्रेम यामुळे ही निवडणूक आव्हानात्मक आहे असे मला अजिबात वाटत नाही. मला लांजा कुवेवासियांची जनसेवा करण्याची संधी प्राप्त होणार असल्यामुळे मी लांजा कुवेवासियांच्या सुखदु:खात मी माझ्या नावाप्रमाणे ’सावली’सारखी उभी राहीन असा शब्द सावली कुरूप यांनी आपल्या मुलाखतीतून दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg