loader
Breaking News
Breaking News
Foto

सा. बां. विभाग खेडकडून पूल तोडण्यापूर्वी योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार- शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर

दापोली (प्रतिनिधी) - दापोली-खेड मार्गावरील काळकाई कोंड येथील मशीदीजवळचा पूल पाडण्याचा प्रयत्न योग्य त्या उपाययोजना न करता केला गेल्यास आपण तीव्र आंदोलन छेडू असा स्पष्ट आणि रोखठोक सज्जड इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी शिवसेनेच्या वतीने प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे दापोली प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.दापोली-खेड मार्गाचे हॅम अंतर्गत काम सध्या सुरू असून दापोली शहरातील काळकाई कोंड येथील मशीदीजवळचा पूल नव्याने बांधण्यासाठी सध्या आहे तो पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग खेडकडून या ठिकाणी मार्ग वळवण्याबाबतचा सूचना फलक लावण्यात आला असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या पुलाजवळ असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिन्यांसदर्भात पाहणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळयात कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी पावसाळ्यानंतर पुलाच्या पुनर्बांधणीचे जरुर काम करावे त्याला आमची हरकत असण्याचे काहीच कारण नाही संपूर्ण सहकार्य शिवसेनेचे राहील. मात्र जनतेला त्रास होणा-या प्रशासनाच्या हेकेखोर वृत्तीला आमचा विरोध राहील. जनतेप्रती आमची बांधिलकी असुन जनतेला त्रास होणा-या कोणत्याही घटनेचे शिवसेना अजिबातच समर्थन करणार नाही. मग त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. जन हितासाठी तडजोड नाही म्हणजे नाही असे गुजर यांनी ठणकावून सांगितल. यानंतर शिवसेना दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, शहरप्रमुख आणि नगरसेवक संदीप चव्हाण, शहर संघटक प्रदीप गमरे, युवा शहर अधिकारी साईराज मोरे आदिंसह शहरातील जागृत नागरिक यांनी घटना स्थळाची पाहणी केली. त्यानंतर दापोली तहसिलदार आणि दापोली पोलिसांजवळ संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर म्हणाले की, दापोली-खेड रस्त्याचे काम ज्या पध्दतीने सुरू आहे. ते पाहता पुढच्या दोन महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल, याची खात्री कोणालाही देता येणार नाही. पुलाच्या पलीकडे मोठया प्रमाणात नागरी वस्ती असून महाविद्यालय आहे. या पुलाचे काम सुरू असताना मोठया प्रमाणात पाऊस झाल्यास येथे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाइम्स स्पेशल

एस.टी. व अन्य खासगी वाहतुकीसाठी प्रशासनाने जो मार्ग सुचवला आहे. त्या मार्गावरून वाहतूक वळविण्यात येणार असल्याने सुमारे 20 रूपये अधिकचा आर्थिक भुर्दंड जनतेला उगाचच सोसावा लागणार आहे. त्याशिवाय वाहतुकीच्या गैरसोयीमुळे ऐन हंगामात टाळसुरे, आपटी, नारगोली, कुंभवे, वाकवली, फुरूस आदी गावांतील व मार्गावरील प्रवासी जनतेचे मोठया प्रमाणात हाल होणार आहेत. अशाप्रकारची वस्तुस्थिती असतानाही अधिकाऱ्याना मात्र जनतेच्या त्रासाचे काहीही देणेघेणे पडल्याचे दिसत नाही. याबाबत संबंधितांनी योग्य ती कार्यवाही न केल्यास जनहितार्थ शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल आंदोलनादरम्यान निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासनाचा हलगर्जीपणाच जबाबदार राहील. अशाप्रकारचा स्पष्ट आणि रोखठोक इशारा दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg