loader
Breaking News
Breaking News
Foto

​पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत; हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कोकण दुमदुमले

​रत्नागिरी (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर करून देशाच्या राजकारणात महिलांचा सन्मान अधोरेखित केला आहे. या क्रांतीकारी निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी शहरात महिलांची एक अभूतपूर्व आणि भव्य फेरी काढण्यात आली. या फेरीच्या माध्यमातून कोकणच्या रणरागिणींनी नारीशक्तीचा नवा अध्याय रत्नागिरीच्या भूमीवर लिहिला आहे. ​शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ ते लक्ष्मीचौक या मार्गावर निघालेल्या या फेरीत हजारो महिलांनी अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. हातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आणि ‘सशक्त नारी – सशक्त भारत’, ‘नारीशक्ती ने ठाना है’ अशा घोषणांनी संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते. केवळ रत्नागिरी शहरच नव्हे, तर राजापूर, चिपळूण, संगमेश्वर यांसारख्या लगतच्या तालुक्यांमधूनही महिलांनी या फेरीत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून विधेयकाचे स्वागत केले. ​भाजपा महिला जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या कणखर नेतृत्वाखाली या भव्य फेरीचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महिलांना संबोधित करताना ढेकणे यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. "महिलांना आता केवळ घरातच नव्हे, तर संसदेत आणि विधानसभेतही धोरण निश्चितीचा मान मिळणार आहे, हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लक्ष्मीचौक येथे या फेरीची सांगता झाली. यावेळी केवळ घोषणाबाजीच नव्हे, तर कृतीतूनही पाठिंबा दर्शवण्यात आला. उपस्थित हजारो महिलांनी भव्य फलकावर स्वाक्षऱ्या केल्या आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या क्रमांकावर 'मिस्ड कॉल' देऊन या ऐतिहासिक विधेयकावर मोहोर उमटवली. हा उपक्रम फेरीचे मुख्य आकर्षण ठरला. या फेरीत वर्षा ढेकणे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मृणाल शेट्ये, नपुरा मुळये, अपेक्षा दाभोळकर, ऐश्वर्या जठार, श्रुती ताम्हणकर, भक्ती दळी, सुप्रिया रसाळ, सुयोगा जठार, स्वाती कानगुटकर, शितल रानडे, रूपाली कदम, सुचिता नाचणकर, अनघा साळवी, शितल पंडित, सायली वाझे, रुई खेडेकर, रूपालीताई दांडेकर, रसिका देवळेकर, दीप्ती महाडीक, सुप्रिया उत्तेकर, वैशाली निमकर, अंजली कदम, वैदेही बने, शितल दिंडे, सुप्रिया बेंद्रे, भक्ती शेटे, धृवी लाकडे यांसह रत्नागिरी पालिकेतील नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

टाइम्स स्पेशल

याखेरीज या ऐतिहासिक प्रसंगी माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष दादा ढेकणे, निलेश आखाडे, संदीप सुर्वे, संतोष सावंत, नगरसेवक राजू तोडणकर, नितीन जाधव, प्रसाद बाष्ट्ये, नंदू चव्हाण, नितीन गांगण, राजन पटवर्धन, विक्रम जैन, प्रशांत घाणेकर, राजेश आंबेकर यांच्यासह भाजपा व शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​या विराट मोर्चामुळे रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात महिला सक्षमीकरणाचा एक ठोस आणि सकारात्मक संदेश गेला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभा-लोकसभेपर्यंत महिलांचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे समोर येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg