loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ३०० दिव्यांगांना मिळणार आधुनिक कृत्रिम पायांची भेट; २४ मे रोजी भव्य मोजमाप शिबिर

रत्नागिरी : कोकणातील दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्यासाठी भारत विकास परिषद (भा.वि.प.) दिव्यांग केंद्र पुणे, स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत एका विशेष मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी, २४ मे २०२६ रोजी साळवी स्टॉपजवळील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हे मोजमाप शिबिर पार पडणार असून, याद्वारे ३०० गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक 'मॉड्यूलर' कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिव्यांग शिबिर व्यवस्था समन्वयक दीपक पटवर्धन यांनी उपस्थितांचे स्वागत करून शिबिराची पार्श्वभूमी मांडली. यावेळी पुणे येथील दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी आधुनिक मॉड्यूलर तंत्रज्ञानाचे महत्त्व विषद केले. त्यांनी सांगितले की, बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे पाय पारंपारिक जयपूर फूटपेक्षा अत्यंत वेगळे आणि प्रगत आहेत. वजनाने हलके आणि 'ऑटोफोल्ड' सुविधा असलेले हे पाय बसवल्यानंतर व्यक्ती केवळ चालूच शकत नाही, तर धावणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामे देखील सहजपणे करू शकते. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तीचे परावलंबित्व संपून ती सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकणार आहे. ​भारत विकास परिषद ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून देशपातळीवर सेवा आणि संस्कारांचे कार्य करत आहे. पुण्यातील त्यांचे केंद्र गेल्या २५ वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असून, दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि कॅलिपरचे वाटप करते. विशेष म्हणजे, एप्रिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून या केंद्राने 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपल्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. हाच सेवेचा वारसा आता रत्नागिरीत आणला जात आहे.

टाईम्स स्पेशल

​रत्नागिरी जिल्हा, संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि गोवा परिसरातील दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, शिबिरातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी 'पूर्व नोंदणी' बंधनकारक करण्यात आली आहे. ज्यांनी आधी नोंदणी केली आहे, त्यांनाच शिबिरात प्रवेश दिला जाईल. नोंदणीसाठी कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा संजीव (७०२८०४५९५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्कॉन प्रो. उद्योग समूहातर्फे शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहायकांसाठी मोफत चहा आणि भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती राहुल पुरकर यांनी दिली. ही सेवा रत्नागिरीतील दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg