loader
Breaking News
Breaking News
Foto

मोबाईलमध्ये 'चिप' टाकण्याचे टेन्शन मिटले; रत्नागिरीत बीएसएनएलची 'ई-सिम' क्रांती आणि १८८ टॉवरचे जाळे

​रत्नागिरी (किशोर मोरे) : तंत्रज्ञानाच्या धावपळीच्या युगात 'भारत संचार निगम लिमिटेड'ने (BSNL) रत्नागिरी जिल्ह्यात एक मोठे पाऊल उचलले आहे. आता मोबाईलमध्ये प्रत्यक्ष सिमकार्ड टाकण्याची कटकट कायमची मिटणार असून, जिल्ह्यात प्रथमच 'ई-सिम' (eSIM) संकल्पना कार्यान्वित करण्यात आली आहे. आयफोनसह अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांना आता स्वतःचा आवडीचा नंबर निवडून थेट 'डिजिटल लिंक'द्वारे आपले सिम ॲक्टिव्हेट करता येणार आहे. सिमकार्ड खराब होणे, हरवणे किंवा सिम स्लॉटची अडचण यांसारख्या समस्या आता इतिहास जमा होणार आहेत. ​या डिजिटल क्रांतीसोबतच जिल्ह्याचा कनेक्टिव्हिटीचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे. जिल्ह्यात एकूण १८८ नवीन टॉवर उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, टप्पा दोन अंतर्गत हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, दुर्गम भाग आणि पर्यटन स्थळांना प्राधान्य देत गावागावांत नेटवर्क पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकल्पाच्या वर्गीकरणानुसार, कॅटेगरी पाचमध्ये सहा नवीन टॉवर उभारले जात असून ११ जुन्या टॉवरच्या आधुनिकीकरणाचे काम सुरू आहे. तर कॅटेगरी सहामध्ये ४० नवीन टॉवरना मंजुरी मिळाली असून चार जुन्या टॉवरचे रूप पालटले जात आहे. या आधुनिकीकरणात जुन्या २-जी टॉवरना थेट ३-जी आणि ४-जी च्या प्रवाहात आणले जात आहे. या संपूर्ण प्रकल्पात साधारण ४६ नवीन टॉवर आणि १५ आधुनिकीकरण केलेल्या टॉवरचा समावेश असून, प्रत्येक टॉवरसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ​सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात बीएसएनएलचे ८०२ टॉवर कार्यरत आहेत. यामध्ये १६५ टॉवर २-जी चे, २५२ टॉवर ३-जी चे आणि सर्वाधिक ३८५ टॉवर ४-जी सेवा पुरवत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या जिल्ह्यात दुर्गम भागातही बीएसएनएलची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गावे निश्चित करण्यात आली आहेत.

टाइम्स स्पेशल

या महाकाय प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे बीएसएनएलच्या अधिकारी अमृता लेले यांनी सांगितले. सरकारी यंत्रणांच्या समन्वयामुळे जागेचे प्रश्न सुटल्याने टॉवर उभारणीला गती मिळाली आहे. एकूणच, 'ई-सिम'च्या सुविधेमुळे शहरी ग्राहकांना वेगवान अनुभव मिळेल, तर ग्रामीण भागातील नवीन टॉवर्समुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न कोकणच्या मातीत खऱ्या अर्थाने रुजताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg