loader
Breaking News
Breaking News
Foto

जलवाहतुकीमुळे जिल्ह्याचे वाढणार पर्यटन

वरवेली (गणेश किर्वे) - बाल्टिक समुद्रावरुन अत्याधुनिक बोटी लवकरच जलवाहतुकीसाठी आणण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यातच आता गुहागरनजीकच्या दाभोळ बंदरात हाऊसबोट सुरु झाली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचे जलपर्यटन वाढणार असून पर्यटनाच्यादृष्टीने गुहागरचे महत्व अधिक वाढणार असून पर्यटकांवर अवलंबून असलेल्या येथील उद्योग, व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकणाच्या जल पर्यटनाला एक नवा आयाम देत दापोलीचे माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल यांची भव्य हाऊसबोट दाभोळ खाडीमध्ये दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या हाऊसबोटमध्ये ८ खोल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने खोल्या असलेली ही महाराष्ट्रातील पहिली हाऊसबोट असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोकणाच्या जलपर्यटनाला एक आलिशान अनुभव मिळणार आहे. कोकणातील खाड्या बोटीच्या माध्यमातून जोडून डॉ. मोकल यांनी यापूर्वीच कोकणच्या पर्यटन क्षेत्रात वेगळी क्रांती केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता सुवर्णदुर्ग शिपिंगच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी अत्याधुनिक हाऊसबोटमुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य, जैवविविधता, कांदळवन जवळून अनुभवता येणार आहे, तसेच कोकणी खाद्य पदार्थांची चवही चाखता येणार आहे. साहजिकच केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात जलपर्यटन वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दाभोळ हे दापोली तालुक्याचे किनारपट्टी भागातील शेवटचे टोक आहे. मात्र, सर्वाधिक या खाडीचा परिसर गुहागरला लागून आहे. दाभोळला उपसागर असेही म्हणतात. दाभोळ हे ऐतिहासिक बंदर असून खाडीच्या मुखाजवळ आहे. या खाडीच्या किनाऱ्यावर किल्ले, ऐतिहासिक बंदरे, ऐतिहासिक मंदिरे, मशिदी, ऐतिहासिक गुहा, गरम पाण्याचे झरे, जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती कारखाने, नैसर्गिक संसाधने, पर्यटन, दाभोळ पॉवर कंपनी, कोकण एलएनजी, वीज निर्मिती आणि वायू प्रकल्प, यांत्रिक आणि अयांत्रिक मासेमारी, मुंबई ते कोकण रो-रो सेवेसाठी जेट्टी आणि भविष्यातील सागरी महामार्ग व खाडीवर पूल होण्याची शक्यता आहे, या सर्व गोष्टींमुळे दाभोळखाडीला अनन्य साधारण महत्व आहे.

टाइम्स स्पेशल

सुमारे ५० वर्षापूर्वी मुंबईतून गोवा प्रवासी जलवाहतूक सुरु होती. त्यावेळी उतरण्याचे दाभोळ हा सागरी थांबा होता. काही काळाने ही जलवाहतूक बंद झाली. मात्र, दाभोळचे महत्व कधीही कमी झाले नाही. अगदी एन्‌राँन प्रकल्पासून ते आजपर्यंतच्या बहुचर्चित आरजीपीपीएल प्रकल्पामुळे दाभोळ हे देशभरात नावलौकीक प्राप्त झालेले बंदर आहे. अशा दाभोळ खाडीत आता जलवाहतूक सुविधा सुरु झाली आहे. आता मुंबई ते गोवा अशी जलवाहतूक कायम सुरु झाल्यास दाभोळचे महत्व वाढणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटक दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी येतात. जलवाहतुकीमुळे पर्यटकांना एकाचवेळी या सागरी मार्गातून बोटीने प्रवास करता येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg