चिपळूण: काही व्यक्ती आपल्या कार्याने, समर्पणाने आणि सेवाभावाने समाजाच्या अंतःकरणात कायमचे स्थान निर्माण करतात. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक तेजस्वी नाव म्हणजे दसपटी विभागातील पेढांबे गावचे सुपुत्र प्रतापराव शिंदे. शिक्षण, कला, क्रीडा, समाजकार्य आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय ठसा उमटवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तित्वात शिस्त, जिद्द, प्रामाणिकता आणि लोकसेवेची निष्ठा एकवटलेली आहे. प्रतापराव यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. आदर्श शाळा पेढांबे येथे, तर माध्यमिक शिक्षण अलोरे हायस्कूल येथे झाले. बालपणापासूनच त्यांच्यातील कर्तृत्वाची झलक शिक्षकांच्या नजरेत आली होती. शिक्षणासोबतच त्यांनी कबड्डी या मातीतल्या खेळात अप्रतिम कौशल्य दाखवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या चिकाटीने आणि क्रीडावृत्तीने त्यांना मुंबई पोलीस दलात भरती होण्याची संधी मिळाली आणि याच क्षणापासून त्यांच्या जीवनातील नवा अध्याय सुरू झाला.
मुंबई पोलिस सेवेत कार्यरत असताना त्यांनी केवळ आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली नाही, तर कबड्डीच्या मैदानावरही संघाचे नेतृत्व करत असंख्य खेळाडू घडवले. मुंबई पोलिस कबड्डी संघाचे कर्णधार व प्रशिक्षक म्हणून त्यांनी संघाला नवे यश मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुणांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवले. क्रीडाविकासाच्या वाटचालीत त्यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारणी सदस्य तसेच मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आणि कबड्डीच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न केले. त्यांच्या क्रीडाभक्तीमुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आणि कबड्डीला नवी प्रतिष्ठा लाभली. नोकरीच्या जबाबदार्यांमध्ये गुंतूनही त्यांनी आपला समाजकार्याचा ध्यास सोडला नाही. आपल्या पेढांबे या मूळ गावी त्यांनी अनेक उपक्रम राबवून गावाच्या विकासाला चालना दिली. रामवरदायनी मंदिर देवस्थानाचे सलग दहा वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा उभारणी, तसेच पेढांबे गावची ग्रामदेवता सुकाईदेवी मंदिराच्या पुनर्बांधणीसारखी अनेक उल्लेखनीय कामे केली. त्यांच्या नेतृत्वामुळे गावात केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा भावही दृढ झाला.
समाजकार्याची प्रेरणा त्यांना त्यांचे आजोबा कारभारी तानाजीराव शिंदे, चुलते मधुकरराव शिंदे आणि बंधू बाबारामराव शिंदे यांच्या कार्यातून लाभली. या संस्कारवृक्षाच्या छायेखाली वाढलेल्या प्रतापराव शिंदे यांनी जनसेवा हेच जीवनाचे ध्येय मानले. त्यांनी समाजासाठी केलेली प्रत्येक कृती ही नि:स्वार्थ, सच्च्या सेवाभावातून प्रेरित होती. त्यांच्या कार्याचा परीघ समाजसेवेपुरताच मर्यादित राहिला नाही. राजकारणातही त्यांनी निष्ठेने पाऊल टाकले आणि शिवसेना पक्षात तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य, उपसभापती तसेच उपजिल्हाप्रमुख या जबाबदार्या समर्थपणे सांभाळल्या. प्रतापराव शिंदे यांचे आयुष्य म्हणजे परिश्रम, प्रामाणिकता आणि जनसेवेचे सुंदर मिश्रण आहे. त्यांचा प्रत्येक दिवस समाजाच्या भल्यासाठी आणि पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा, अशी त्यांची जीवनशैली आहे. त्यांच्या वर्तनातील साधेपणा, विचारातील परिपक्वता आणि कृतीतील प्रामाणिकता हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.