संगमेश्वर (सत्यवान विचारे) - उदयोन्मुख गायक- वादक कलाकारांचा गौरव व्हावा या हेतूने देवरुख अभिरुची संस्थेने शहरातील गायक कलाकार कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्घी शितूत तसेच तबला अलंकार अथर्व आठल्ये यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, दिवाळी भेट व प्रत्येकी पाच हजारचा धनादेश देवून गौरव करण्यात आला. याच अनुषंगाने प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले स्वराधिराज कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर व तबला विश्वातील गुरुवर्य गिरीधर कुलकर्णी यांचा संगीत साधक शामकांत अळवणी यांचे हस्ते शाल, श्रीफळ, व दिवाळी भेटवस्तू देवून त्यांच्या कार्याप्रती संस्थेने आदर व्यक्त केला. शहरवासियांना संगीतमय शुभेच्छा देण्यासाठी अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई व सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अभिजात संगीत मैफलीचे आयोजन केले होते. या मैफलिला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मैफलीचा प्रारंभ कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले व सिद्घी शितूत यांनी पंचतुंड नररुंड मालधर या नांदीने केला. अथर्व आठल्ये (तबला), चैतन्य पटवर्धन (ऑर्गन), आदित्य साधले (हार्मोनियम) व नील भावे (तालवाद्य) यांच्या सुंदर साथीने तीघा कलाकारांची संगीत मैफल चांगलीच रंगली.
कुणाल भिडे याने आपल्या दमदार आवाजात सुखाचे जे सुख..,झाले युवती मना दारुण रणरुचिर प्रेमसे..,पद्मनाभा नारायणा अशी एकापेक्षा एक बहारदार गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. नेहा प्रभुघाटे-साधले हिने निरुपणा ऐसे नाही समाधान (श्री रामदास स्वामी), मतवारो बादल आयो रे, उगवला चंद्र पूनवेचा..,बाजे मुरलीया बाजे ही गीते लिलया सादर केली. रसिकांनीही नेहाच्या गीतांना भरभरुन दाद दिली. सिद्घी शितूत हिने मैफलीत रंग भरताना नाथ हा माझा मोही खला..,खरा तो प्रेमा...,हसले मनी चांदणे..,वद जावू कुणाला शरण..हि गीते सादर केली. सिद्घीच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. मैफलीचा शेवट अगा वैकुंठीच्या राया ..या कुणाल भिडे यांनी गायलेल्या भैरवीने झाला.
तबला अलंकार अथर्व आठल्ये याने एकल वादनात दिल्ली घराण्याच्या बाजाने तीन तालातील पेशकार, कायदा, रेला सादर करुन तबल्यावरील आपली हुकुमत रसिकांना दाखवून दिली. अथर्वला चैतन्य पटवर्धन यांची हार्मोनियम साथ लाभली. हार्मोनियम वादक चैतन्य पटवर्धन यांनी लेहरा व नगमा वादन सादर करून सूरांची जादू दाखवून दिली. अगा वैकुंठीच्या राया..या कुणाल भिडे यांनी गायलेल्या भैरवीने शानदार मैफलीची सांगता झाली. रसिकांनी मैफलीला चांगलीच दाद दिली. दिवाळी मैफलीसाठी मंगेश प्रभुदेसाई, अप्पा आठल्ये यांनी सुत्रसंचालनाची बाजू सांभाळली. मैफलीसाठी प्रसाद गानू, अॅड.समीर आठल्ये, सोहम प्रभुदेसाई, हेरंब कुलकर्णी, शौनक आठल्ये यांचे योगदान लाभले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.